समाजाच्या सदृढ आरोग्याचा वसा घेतलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे व्रत जोपासले जाते -उत्तमचंद मंडलेचा
नगर (प्रतिनिधी)- समाजातील लहान बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्यदूत बनला आहे. समाजाच्या सदृढ आरोग्याचा वसा घेऊन सेवाभावाने आरोग्यसेवेचे व्रत या हॉस्पिटलमध्ये जोपासले जात आहे. अध्यात्मतेची जोड असलेल्या आरोग्याचा वसा सेवाभावी वृत्तीने सुरु असून, या सेवा कार्याला हातभार लावून ईश्वरपूजेचा समाधान मिळत असल्याची भावना उत्तमचंद मंडलेचा यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सौ. पुष्पलता उत्तमचंद मंडलेचा व मंडलेचा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत बालरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मंडलेचा बोलत होते. याप्रसंगी किशोरकुमार जैन, अनिताताई जैन, संयम जैन, पियुष मंडलेचा, परेश मंडलेचा, राजेंद्र ताथेड, पोपटशेठ लोढा, शांतीलाल संकलेचा, पंकज नाबरिया, प्रफुल भंडारी, सतीश (बाबुशेठ) लोढा, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, डॉ. आशिष भंडारी, सुभाष मुनोत, बालरोगतज्ञ डॉ. गणेश गव्हाणे, डॉ. वैभवी वंजारे, डॉ. दीप्ती अग्रवाल आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रकाश छल्लाणी म्हणाले की, मंडलेच्या परिवाराने सातत्याने आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्यसेवेच्या कार्यात हातभार लावला आहे. उच्च सुशिक्षित असलेला हा परिवार सेवा कार्याशी जोडला गेलेला आहे. हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक मोफत डायलिसिस आणि गरजूंवर अल्पदरात हृदयाचे शस्त्रक्रिया केल्या जात आहे. समाज निरोगी रहावा आणि सर्वसामान्यांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने मिशन म्हणून सेवा कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
पियुष मंडलेचा म्हणाले की, आरोग्यसेवा समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटल करत असून, या सेवा कार्यात मंडलेचा परिवाराचे नेहमीच योगदान राहणार आहे. या रुग्णसेवेतून सर्वसामान्यांना जगण्याची उमेद मिळत असल्याचे ते म्हणाले. राजेंद्र ताथेड यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. किशोरकुमार जैन यांनी हॉस्पिटलच्या सेवा कार्याचे कौतुक करुन, सर्वसामान्यांना उपचारासाठी आधार मिळत असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. गणेश गव्हाणे म्हणाले की, कृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवसाला होत असलेले हे शिबिर एक पर्वणी म्हणून आहे.
लहान बालकांच्या आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत एनआयसीयू सेंटर कार्यान्वीत असून, तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम सेवा देत आहे. 26 बेडच्या अद्यावत एनआयसीयू विभागात नवजात बाळाच्या श्वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार, बालदमा ए.आर.डी.एस. (श्वसनदाह), नवजात बालकांच्या कावीळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा, अनुवंशिक आजार, जन्मजात आजारांचे निदान व उपचार, बालदमा तसेच लहान मुलांचे टू डी इको, एक्स रे, पॅथोलॉजी लॅब व डायलिसिस मशीन द्वारे सेवा उपलब्ध आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
या शिबिरात 115 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार सतीश (बाबुशेठ) लोढा यांनी मानले.