महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन
सकस आहार, व्यायाम व तणावमुक्त जीवनशैली निरोगी जीवनाचे रहस्य -डॉ. जयश्री रौराळे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात महिलांची विविध आरोग्य तपासणी करुन त्यांना आरोग्यावर मार्गदर्शन करण्यात आले. जयश्री नर्सिंग होम (भागीरथी हॉस्पिटल), स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ तसेच धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरास पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ. जयश्री रौराळे, डॉ. विजय जाधव, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, नामदेव फलके, माजी सरपंच रुपाली जाधव, लता कापसे, संदीप साळवे, दिलीप खरात आदींसह महिला उपस्थित होत्या.
डॉ. जयश्री रौराळे यांनी महिलांची तपासणी केली. डॉ. रौराळे म्हणाल्या की, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव व चुकीची आहार पध्दतीमुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. आजारावर मात करण्यासाठी त्याचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश न केल्यास महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होते. गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते. तणावामुळे महिलांना अनेक गंभीर आजारांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन सकस आहार, व्यायाम व तणावमुक्त जीवनशैलीने निरोगी जीवनाचे रहस्य त्यांनी उलगडले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, निरोगी आरोग्य असल्यास जीवनाचा खरा आनंद घेता येतो. महिलांनी कोणताही आजार अंगावर काढू नये, स्वत:ची काळजी घेतल्यास कुटुंबाची काळजी घेता येणार आहे. वेळेवर आरोग्य तपासणी केल्यास भविष्यातील मोठ्या आजाराचा धोका टाळता येणे शक्य असून, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….