• Thu. Apr 9th, 2026

नागरदेवळेत शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

ByMirror

Apr 8, 2026

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम


फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, 10 एप्रिल रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिर परिसरात पार पडणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.


या शिबिरामध्ये तज्ज्ञ नेत्ररोग डॉक्टरांकडून अद्ययावत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच जेष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आवश्‍यक आरोग्य तपासण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्वसमावेशक आरोग्य सेवा मिळणार आहे.


नेत्र तपासणीनंतर ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्‍यकता भासेल, अशा रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू तसेच लहान मुलांच्या तिरळेपणावरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांचे पुणे येथे येणे-जाणे, राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.


या शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी जालिंदर बोरुडे (मो. 9881810333) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *