राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त जायंट्स ग्रुपचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि.28 मार्च) जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पशू आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 135 जनावरांची तपासणी करून आवश्यक लसीकरण व औषधोपचार करण्यात आले. या शिबिराचे हे 25 वे वर्ष होते.
जुने बस स्थानक, नगर-पुणे महामार्गावरील जवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे होते. डॉ. तुंबारे यांनी पशुसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगत, मुक्या प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. पशुपक्षी आपल्या भावना त्यांच्या वेगळ्या भाषेतून व्यक्त करतात. त्यांचे दुःख वेदना समजून पशुचिकित्सक त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार करतात. मुक्या प्राण्यांच्या वेदनांची जाणीव ठेवून संवेदनशीलतेने त्यांची काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

डॉ. मुकुंद राजळे यांनी जायंट्स ग्रुप जनावर व पशुंच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने सातत्याने घेत असलेले शिबिर दिशादर्शक आहे. जनावरांना बोलता येत नाही. त्यांच्या रोगाचे निदान करुन उपचार करणे अवघड बाब असल्याचे स्पष्ट करुन प्राण्यांच्या आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले.
प्रास्ताविकात जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे म्हणाले की, यंदा शिबिराचे 25 वे वर्ष आहे. या उपक्रमात गाय, बैल, घोडे, कुत्रे, शेळ्या आणि मांजरांसाठी अँटी-रेबीज व धनुर्वात लसीकरण तसेच जंतनाशक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिरासाठी सातत्याने अजय मेडिकलतर्फे औषध पुरवठा करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.
शिबिरात डॉ. मुकुंद राजळे, डॉ. ज्ञानेश्वर काळे, डॉ. वसंत गारुडकर आणि डॉ. कार्तिक शिंगटे यांनी तपासणी व उपचार केले. स्मृतिदिनानिमित्त जायंट्स ग्रुपच्या वतीने अन्य सामाजिक उपक्रमही राबवले गेले. पांजरपोळ गो शाळेत जनावरांसाठी चारा वाटप, व्हीआरडी येथील महानुभव आश्रमात वृक्षारोपण, तर आनंदधाम येथे रक्तदान शिबिरात सदस्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी दिली.
शिबिरासाठी वीरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड व इंटास कंपनीने मोफत औषधे पुरवली. या कंपन्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत मुठे आणि अविनाश घोलप यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, अजय मेडिकलचे संचालक दर्शन गुगळे, नूतन गुगळे, माजी अध्यक्ष अनिल गांधी, अमित धोका, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांधी यांनी केले. आभार अमित मुनोत यांनी मानले.