बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा उपक्रम; एक महिन्याचे मार्गदर्शनपर प्रशिक्षण
युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी एक महिन्याच्या कालावधीचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. बार्टीचे प्रकल्प अधिकारी सय्यद दिलावर, विभागीय अधिकारी आलोक मिश्रा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास आणि एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी रमेश जाधव यांनी सर्व पात्र युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या प्रशिक्षणाचा शुभारंभ दि. 20 नोव्हेंबर रोजी होणार असून समारोप दि. 19 डिसेंबर रोजी करण्यात येईल. हा कार्यक्रम अहिल्यानगर जिल्हा उद्योग केंद्र परिसरातील शासकीय आयटीआय (MCED कार्यालयात) पार पडणार आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींना स्वयंरोजगार आणि उद्योग व्यवसाय उभारणीसाठी सक्षम बनविणे हा आहे. प्रशिक्षणाद्वारे सहभागी उमेदवारांना उद्योग उभारणी, व्यवस्थापन, बाजारपेठेचे आकलन आणि वित्तीय नियोजन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास व उद्योग निवड प्रक्रिया, उद्योग उभारणी आणि व्यवस्थापन पद्धती, बाजारपेठेचा अभ्यास व विक्री व्यवस्थापन, उद्योगाशी संबंधित कायदे आणि परवाने, उद्योग आधार नोंदणी, शासकीय योजना व कर्ज सुविधा, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण व प्रकल्प अहवाल तयार करणे, हिशोब पद्धती, उत्पादनाचे मूल्यनिर्धारण, डिजिटल मार्केटिंग व वित्तीय व्यवस्थापन या विषयावर अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच प्रत्यक्ष उद्योगांना भेटी देखील दिल्या जाणार आहेत.
या प्रशिक्षणासाठी उमेदवार किमान आठवी उत्तीर्ण असावा व वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे इतकी आहे. प्रवेशासाठी जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड व पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र या कागदपत्रासह इच्छुक उमेदवारांनी दि. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत शनिराज प्रिंटिंग क्लस्टर, तपोवन रोड, अहिल्यानगर येथे उपस्थित राहण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच दिवशी मुलाखत घेऊन प्रशिक्षणार्थींची अंतिम निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्जासाठी तेजस वैद्य (मो. नं. 7378893673) यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.
