• Wed. Nov 5th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये किडनी आजारावर मोफत तपासणी

ByMirror

Mar 5, 2024

रुग्णांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

निरोगी समाज घडविणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल -सुनिल छाजेड

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन दशकापासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या आचार, विचारातून रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या या आरोग्य सेवेत अनेकांचे दातृत्व मिळत असून, निरोगी समाज घडविण्याचे कार्य सुरू आहे. सर्वसामान्यांमध्ये मोठा विश्‍वास संपादन करुन हा हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल ठरले आहे. या सेवाकार्यात हॉस्पिटलचे सर्व विश्‍वस्त, डॉक्टर व कर्मचारी मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन सुनिल छाजेड यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त स्व. कुसुमबाई अशोककुमार छाजेड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ छाजेड परिवाराच्या वतीने आयोजित मोफत किडनीचे आजार तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी छाजेड बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, आनंद छाजेड, समता छाजेड, अभिजीत भळगट, निखिलेंद्र लोढा, डॉ. आशिष भंडारी, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, प्रकाश छल्लाणी, अजित पारेख, सुभाष मुनोत, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. गोविंद कासट आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात निखिलेंद्र लोढा यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य अविरत सुरु आहे. सेवाभाव हा उद्देश समोर ठेवून प्रत्येकाचे योगदान मिळत असून, छाजेड परिवाराच्या माध्यमातून देखील आरोग्यसेवेच्या महायज्ञात भरीव योगदान दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. आशिष भंडारी यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या अद्यावत डायलेसिस विभागाच्या माध्यमातून रुग्णांचे आयुर्मान वाढले आहे. अनेक रुग्णांना या विभागाच्या माध्यमातून सेवा दिली जात असून, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत डायलेसिस मोफत केले जात असल्याचे स्पष्ट करुन शिबिराची माहिती दिली.


दिलीप सातपुते म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल मधून सर्वसामान्यांना आधार मिळत आहे. राज्यातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये येतात. आरोग्य सेवेचा सर्वोत्तम दर्जा आणि माफक दरात व काही उपचार मोफत होत असल्याने हॉस्पिटलने राज्यात ख्याती मिळवली आहे. आजार हे अचानक कोसळणारे संकट असून, गोरगरिबांना सर्वात प्रथम आनंदऋषीजी हॉस्पिटलचा पर्याय समोर येतो. हसत-खेळत येथे रुग्ण बरे होऊन घरी जातात. जैन सोशल फेडरेशन आरोग्याबरोबरच नवीन शैक्षणिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवत असून, ते देखील समाजासाठी दिशा देणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिरात 125 रुग्णांची किडनीच्या आजारासबंधी तपासणी करण्यात आली. डॉ. गोविंद कासट यांनी अंगावर सुज येणे, लघवी कमी/ लाल होणे, किडनी जंतुसंसर्ग, डायलेसिस आदीसंदर्भात तपासण्या केल्या. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. गुरुवारी (दि.7 मार्च) बालरोग तपासणी शिबिर होणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *