शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतिक -प्रकाश शाह
अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतिक बनले आहे. या आरोग्यसेवेची ख्याती संपूर्ण राज्यात पसरली असून, हे कार्य पाहण्यासाठी पुण्याहून नगरला आलो. या आरोग्य मंदिरातून चोवीस तास मानवसेवा घडत असून, या सेवा कार्यासाठी प.पू. आनंदऋषीजी महाराजांची शक्ती मिळत असल्याचे प्रतिपादन पुणे येथील उद्योजक प्रकाश शाह यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त घनशाम दासजी वल्लभदासजी शाह यांच्या स्मरणार्थ निरुपाबेन घनशामदासजी शाह परिवाराच्या वतीने आयोजित मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शाह बोलत होते. हॉस्पिटलचे निस्वार्थ सेवा कार्य पाहून त्यांचे अशरक्ष: डोळे पाणावले. यावेळी जिगनेशभाई शाह, परागभाई शाह, प्रमय शाह, निलम शाह, तेजल शाह, प्रतिमा शाह, संतोष बोथरा, सतीश लोढा, निखलेंद्र लोढा, प्रकाश छल्लाणी, सुनिल मालू, डॉ. आनंद छाजेड, सुभाष मुनोत, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अमित थोपटे, डॉ. विनय छल्लाणी, डॉ. राहुल एरंडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये असलेला अद्यावत कार्डियाक विभाग आरोग्यसेवेचा आधार असून, कॅथलॅब देशातील सर्वोत्कृष्ट कॅथलॅब म्हणून नावरुपास आली आहे. कार्डियाक विभागात लहान मुलांपासून वयोवृध्दां पर्यंतच्या हृदयाच्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या जात आहे. हॉस्पिटलमध्ये अद्याप पर्यंत 50 हजारपेक्षा जास्त बायपास सर्जरी, 70 हजारपेक्षा अधिक एन्जोप्लास्टी व एक लाखापेक्षा अधिक अँजिओग्राफी करण्यात आलेली आहे. तसेच 6 हजार लहान बालकांच्या ह्रद्यरोग संबंधी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डॉ. वसंत कटारिया हे हृदयरोग विभागाचेच हृदय असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग सेवेसाठी सज्ज आहे.
दुर्गम भागातील आदिवासी, भटके समाजातील कुटुंबासाठी हे हॉस्पिटल आधार ठरला असून, त्यांना सर्व सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत पुरविल्या जात आहे. तर त्यांची राहण्यापासून जेवणाची सोय देखील केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तर आरोग्य क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात देखील पाऊल टाकण्यात आले असून, भगवान महावीर युनिव्हर्सिटीचा प्रकल्प सुरु आहे. चांगले विचार घेवून सुरु केलेल्या चांगल्या कार्यासाठी अनेकांचे हातभार लागत आहे. हॉस्पिटलच्या नेत्र विभागाच्या माध्यमातून देखील दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचवून दृष्टीदोष असलेल्यांवर उपचार सुरु आहे. गरजू घटकातील ज्येष्ठांना कुटुंबाप्रमाणे आधार देण्याचे काम हॉस्पिटल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तेजल शाह म्हणाल्या की, सकारात्मक विचाराने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सुरु आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यातील समाधान पाहून एक वेगळा आनंद मिळाला. मानवतेच्या या सेवा कार्यात जोडल्याबद्दल कृतज्ञ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. अनिकेत कटारिया यांनी महिन्याला 60 ते 70 बायपास सर्जरी यशस्वी होत असून, आजपर्यंत 50 हजार पेक्षा जास्त बायपास सर्जरी यशस्वी झाल्या आहेत. यासाठी अद्यावत मशनरी उपलब्ध करून उच्च दर्जाची सेवा दिली जात आहे. हॉस्पिटलच्या टीमवर्कने रुग्णांना अल्पदरात सर्वोत्तम दर्जाची सेवा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनिल मालू यांनी शाह परिवाराच्या वतीने सुरु असलेल्या औद्योगिक व सामाजिक कार्याची माहिती दिली.
या शिबिरात 110 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद छाजेड यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.