ग्राम समृध्दी प्रतिष्ठान व चैतन्य हॉस्पिटलचा उपक्रम
साईबाबांच्या विचाराने रुग्ण सेवा ही ईश्वरी सेवेप्रमाणे व्हावी -सीए शंकर अंदानी
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज निरोगी करण्यासाठी आरोग्य चळवळ उभी करण्याची गरज असून, समाजात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्याकाळी साईबाबांनी व्याधीने ग्रासलेल्यांची सेवा करुन त्यांना व्याधीमुक्त केले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन रुग्ण सेवा ईश्वरी सेवेप्रमाणे करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कर सल्लागार सीए शंकर अंदानी यांनी केले.
ग्राम समृध्दी प्रतिष्ठान व चैतन्य हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने एकविरा चौक, तपोवन रोड येथे मोफत सर्व रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी अंदानी बोलत होते. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, अशोक कानडे, संस्थेचे अध्यक्ष अर्जुन बोरुडे आदी उपस्थित होते.
पुढे सीए अंदानी म्हणाले की, खर्चिक आरोग्य सुविधांमुळे मोफत आरोग्य शिबिर मोठे आधार ठरत आहे. विविध गंभीर आजार टाळण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी तपासण्या आवश्यक आहे. आरोग्याप्रति जागरूक राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
अर्जुन बोरुडे म्हणाले की, महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांचा खर्च पेलवत नाही. त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक बोरुडे, बारस्कर व कानडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, श्वसनाचे विकार, मेंदू विकार आदी संदर्भात मोफत तपासणी करण्यात आली. तर गरजूंवर विविध वैद्यकीय चाचण्या सवलतीच्या दरात करण्यात आल्या. तीनशेपेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. अश्पाक पटेल, डॉ. धम्मपाल साबळे, डॉ. किरण गोरे, डॉ. सागर शिरसाठ यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिर यशस्वी होण्यासाठी चैतन्य हॉस्पिटलच्या नर्स व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.