• Thu. Jun 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

लायन्स युवा सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात अहिल्यानगरच्या चार लिओ सदस्यांची आंतरराष्ट्रीय निवड

ByMirror

Jun 17, 2026
नॉर्वे, स्पेन व जर्मनी येथे जाण्याची संधी

जिनेश छाजेड, आरजाकौर वधवा, ओम भंडारी व सई काळे यांचा समावेश


नॉर्वे, स्पेन व जर्मनी येथे जाण्याची संधी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लायन्स युवा सांस्कृतिक देवाणघेवाण (लायन्स युथ एक्सचेंज प्रोग्राम) उपक्रमाला यंदा विशेष यश मिळाले असून, प्रथमच शहरातील चार लिओ सदस्यांना विविध युरोपीय देशांतील आंतरराष्ट्रीय युवा देवाणघेवाण शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.


यापूर्वी गेल्या तीन वर्षांपासून लायन्स क्लब ऑफ अहमदनगरने या कार्यक्रमांतर्गत विविध देशांतील युवा प्रतिनिधींना अहिल्यानगरमध्ये होस्ट करून भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली होती. मात्र यंदा प्रथमच क्लबच्या स्वतःच्या लिओ सदस्यांची परदेशातील युवा देवाणघेवाण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष लायन डॉ. संजय असनानी, लिओ क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष लिओ गुरनूरसिंग वधवा तसेच युवा देवाणघेवाण कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन हरजीतसिंग वाधवा यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.


या कार्यक्रमांतर्गत जिनेश सुनील छाजेड यांची नॉर्वे, कु. आरजाकौर वधवा यांची स्पेन, तर ओम किरण भंडारी आणि सई ज्ञानेश्‍वर काळे यांची जर्मनी येथे निवड झाली आहे. निवड झालेल्या युवकांना संबंधित देशांतील यजमान कुटुंबांमध्ये सुमारे 10 दिवस होम-स्टेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार असून त्यानंतर 11 दिवसांच्या आंतरराष्ट्रीय युवा शिबिरात सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक शिबिरात जगातील विविध देशांमधील सुमारे 30 युवक-युवती सहभागी होणार असून, त्यांना विविध संस्कृती, परंपरा, भाषा, सामाजिक कार्यपद्धती आणि नेतृत्व विकासाचा अनोखा अनुभव मिळणार आहे.


हा युवा देवाणघेवाण कार्यक्रम लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231-ए2, मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे डिस्ट्रिक्ट यूथ एक्स्चेंज चेअरमन लायन दीपेश दोशी हे प्रमुख समन्वयक असून, भारतात येणाऱ्या परदेशी युवकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या इंडिया क्लचरल हेरीटेज कॅम्प या विशेष शिबिराचेही ते नियोजन व समन्वय करतात. या शिबिरामध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची, इतिहासाची, परंपरांची आणि विविधतेची ओळख जगभरातील युवकांना करून दिली जाते.


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप कुलकर्णी, प्रशांत मुनोत, डॉ. सिमरनकौर वाधवा, प्रणिता भंडारी आणि सुनील छाजेड यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शन, नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अहिल्यानगरच्या युवकांना ही आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध झाली. अहिल्यानगरच्या लायन्स आणि लिओ परिवारासाठी हा अभिमानाचा क्षण असून, या युवा प्रतिनिधींमार्फत भारताची संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच या उपक्रमामुळे अहिल्यानगरच्या युवकांना जागतिक स्तरावर मैत्री, नेतृत्व आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचे नवे क्षितिज खुले झाले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *