बुधवारच्या सामन्यात आठरे पाटील, आर्मी पब्लिक व रामराव आदिक स्कूल संघ विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि.25 सप्टेंबर) झालेल्या विविध वयोगटाच्या फुटबॉल सामन्यात आठरे पाटील, आर्मी पब्लिक व रामराव आदिक स्कूल संघांनी दणदणीत विजय मिळवला. सर्व सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना एकही गोल करता आला नाही. दुपारच्या सत्रानंतर रिमझिम पाऊसात फुटबॉलचे सामने रंगले होते.

ही स्पर्धा अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु आहे. 12 वर्ष वयोगटात श्री साई स्कूलच्या संघाने सीआरएस पूर्तता न केल्यामुळे त्यांचा सामना होऊ शकला नाही. पोदार स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात 0-6 गोलने आठरे पाटील स्कूलच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला. सम्यक म्हस्के याने सर्वाधिक 4 गोल करुन विजय निश्चित केला. तर ओम गलांडे व मानस भोसले यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
14 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुध्द डॉन बॉस्को यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने 5-0 गोलने दणदणीत विजय मिळवला. पावसाच्या रिमझिम सरीत आर्मी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करुन आदर्श साबळे 3, प्रतिक शेळके व विवेंद्र वीर याने प्रत्येकी 1 गोल करुन संघाला विजय मिळवून दिला.

16 वर्ष वयोगटात कर्नल परब स्कूल विरुध्द रामराव आदिक स्कूल मधील सामन्यात रामराव आदिक स्कूलने उत्कृष्ट खेळ करुन तब्बल 7 गोल केले. यामध्ये अनिल भोय व ललित गागर्डे यांनी प्रत्येकी 3 व रवी गायकवाड याने 1 गोल केला. 0-7 गोलने रामराव आदिक स्कूलचा संघ विजयी झाला.
आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द रामराव आदिक स्कूल मध्ये सामना रंगतदार झाला. या अटीतटीच्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूल कडून अश्मित पांडे व वेदांत शेंडगे यांनी प्रत्येकी 1 गोल करुन 2-0 गोलने विजय मिळवला.
