• Mon. Oct 27th, 2025

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

ByMirror

Sep 18, 2024

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर पंधरा दिवस रंगणार फुटबॉलचा थरार

फुटबॉल वाढविण्यासाठी ग्रासरूटवर काम करणे आवश्‍यक -नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 2024 चे बुधवार (दि.18 सप्टेंबर) पासून प्रारंभ झाले असून, अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून शालेय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.


या स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रज्जाक सय्यद, नोएल पारघे, डॉ. दिलीप भालसिंग, डॉ. घुले, सॅव्हिओ वेगास, फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालीद सय्यद, जोगासिंह मीनहास, सचिव रॉनप फर्नांडिस, सहसचिव विक्टर जोसेफ, खजिनदार ऋषपालसिंह परमार, सहखजिनदार रणबिरसिंह परमार, कार्यकारिणी सदस्य राजू पाटोळे, पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, युनिटी क्लबचे राजेश चौहान, फिरोदिया शिवाजीयन्स कमिटीचे सचिन पाथरे, राजेश अँथनी, जॉय जोसेफ, अभिषेक सोनवणे आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, फुटबॉल वाढविण्यासाठी ग्रासरूटवर काम करणे आवश्‍यक आहे. मैदानावर खेळाडू आणण्यासाठी जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. फुटबॉल प्रशिक्षण व स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. शहरात फुटबॉल हा मुख्य खेळ बनला असून, स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह दिसून येत आहे. खेळाडूंनीही या खेळाकडे करिअर म्हणून पहावे. स्पर्धेत हरणारा एक दिवस सातत्य ठेवून जिंकतो, त्यामुळे पराभवाने निराश न होता प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर या स्पर्धेसाठी दरवर्षी मैदान उपलब्ध करुन देत असल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे आभार मानले.


मनोज वाळवेकर म्हणाले की, फिरोदिया शिवाजीयन्सच्या माध्यमातून फुटबॉल खेळाडू घडविण्याचे काम केले जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. दरवर्षी ही स्पर्धा रंगतदार होत असून, खेळाडूंना आपले कौशल्य दाखवता येते. या स्पर्धेनंतर लवकरच महाराष्ट्र युथ लीग मध्ये राज्यातील 8 नामांकित संघ उतरणार आहे. यामध्ये फिरोदिया शिवाजीयन्स संघाचा देखील समावेश असणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देऊन शहरात फुटबॉल वाढविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेश परदेशी यांनी अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल खेळताना घडलो असल्याचे सांगून, आपल्या खेळाडू जीवनातील अनुभव विशद केले.


फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 15 दिवस रंगणार आहे. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील एकूण 32 शालेय संघानी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून, ही स्पर्धा 12, 14 व 16 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये होणार आहे. तर 17 वर्षा खालील मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात येत आहे.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मैदान पूजनानंतर आकाशात फुगे सोडून व फुटबॉलला किक मारुन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यात तक्षिला स्कूल, आठरे पाटील स्कूल, प्रवरा पब्लिक स्कूल, ऊर्जा गुरुकुल संघाने विजय मिळवला.


बुधवारी सकाळच्या सत्रात 14 वर्षे वयोगटातील तक्षिला स्कूल विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या सामन्यात 2-0 गोलने तक्षिला स्कूलचा संघ विजयी झाला. श्री साई विरुध्द आठरे पाटील स्कूलच्या सामन्यात आठरे पाटील स्कूलने जोरदार खेळी करुन तब्बल एकापाठोपाठ 14 गोल करुन श्री साई स्कूल संघाचा धुव्वा उडवला. यामध्ये आठरे पाटील स्कूलने विक्रमी गोलने एकहाती विजय संपादन केले.


दुपारच्या सत्रात 12 वर्षे वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूलचा सामना रंगला होता. यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने 4-0 गोलने विजय मिळवला. 14 वर्षे वयोगटात प्रियदर्शनी पब्लिक स्कूल विरुध्द ऊर्जा गुरुकुल मध्ये झालेल्या सामन्यात 0-2 गोलने ऊर्जा गुरुकुल संघाने विजय मिळवला. 12 वर्षे वयोगटात ऑक्झिलियम स्कूल विरुध्द प्रवरा पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात 0-6 गोलने प्रवरा पब्लिक स्कूलने दणदणीत विजय संपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *