महिला दिनाची दृष्टीभेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले. या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या माध्यमातून 48 ज्येष्ठ नागरिक तर 23 महिलांवर मोतीबिंदू व काचबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
नुकतेच शस्त्रक्रिया होऊन ज्येष्ठ नागरिक व महिला शहरात परतले असता फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी त्यांचे स्वागत केले. या ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे नुकतेच महिला दिनानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिराद्वारे के.के. आय बुधराणी पुणे येथे मोतीबिंदू व काचबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी मिळण्यासाठी जिल्ह्यात फिनिक्स फाऊंडेशनने मोठी चळवळ उभी केली आहे. शिबिराचा 1370 चा टप्पा ओलांडला आहे. या शिबिरात झालेल्या शस्त्रक्रियेतून तब्बल 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांना दृष्टी मिळाली आहे. 31 वर्षात आत्तापर्यंत सुमारे 3 लाख 11 हजार जणांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया झाली आहे. दर महिन्याला गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले जाते. या शिबीराच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानाची देखील जनजागृती सुरु असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.