अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार
सर्व खात्यांची नोंदवही वही तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कायनेटिक चौक मधील साई श्रद्धा अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅट धारकांची आर्थिक लूट सुरु असल्याची तक्रार अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोसायटीची रोख वही, सर्वसाधारण खाते वही, वैयक्तिक खाते वही, नाममात्रलेखा, अग्नी मेंटेनन्सच्या पावत्या, खर्चाची प्रामाणिकी, बँक पासबुक, सदनिकेच्या खरेदीची नोंदवही यांची तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे.
कायनेटिक चौक मधील साई श्रद्धा अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅट धारकांकडून सोसायटीचे बँक खाते उघडून अनेक फ्लॅट धारकांकडून आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
एखादी सदनिका घेतल्यानंतर तो पूर्ण प्रकल्प हस्तांतरित होईपर्यंत प्रकल्पाची देखभाल दुरुस्तीसाठी येणारा खर्च बिल्डर कडून मेंटेनन्सच्या नावाखाली वसूल केला जातो. जवळपास सर्व विजेचा खर्च, डेव्हलपमेंट शुल्क, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, लिगल फी, सोसायटी नोंदणी फी, क्लब हाऊस वन टाइम मेंटेनन्स, देखभाल शुल्क अशा विविध शिर्षकाखाली आगाऊ रकमा घेतल्या जातात. मात्र हिशोब देण्यास मात्र टाळाटाळ केले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर बिल्डिंगचे काम प्रॉस्पेक्ट प्रमाणे झाले नसून कुठल्याच सोयी-सुविधा बिल्डरने दिलेल्या नसून, बिल्डरने साई श्रद्धा अपार्टमेंटच्या सदनिका हस्तांतरित केल्या कशा? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे पासून वंचित ठेवणे, लाईट बंद करणे आदी प्रश्नावर विचारणा केली असता, कठोर कारवाई करण्याची धमकी सोसायटीचे सदस्य देत आहेत. तर फ्लॅट धारकांना पुरेशी पार्किंगची सुविधा नसताना त्रास देण्याच्या उद्देशाने व्हिजीटिंग पार्किंग निर्माण करण्यात आली आहे. अनेक फ्लॅटधारकांना पैसे देऊन पश्चातापाची वेळ आली असल्याचे स्पष्ट करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.