मनपा शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हॅपी स्कूल उपक्रमातंर्गत उभारली जाणार मेडिकल रुम
अहमदनगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्या माध्यमातून हॅपी स्कूल उपक्रमातंर्गत डॉ. सोनाली वहाडणे यांच्या वतीने बोल्हेगाव येथील महानगरपालिका प्राथमिक शाळेस मेडिकल रुम उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. इनरव्हील क्लबच्या वतीने मनपाची सदर शाळा दत्तक घेण्यात आली असून, शाळेला विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी मदतीचा हात दिला जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापक अक्षय सातपुते यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा श्रीलता आडेप, खजिनदार शुभांगी देशमुख, आयएसओ जयश्री गायकवाड, संपादक कोमल वधवा, डॉ. सोनाली वहाडणे, सायली खान्देशी, सारिका मुथा, अर्पिता शिंगवी, कल्पना गांधी, स्वाती गांधी, मौसमी गुरवे आदी उपस्थित होत्या.
श्रीलता आडेप म्हणाल्या की, बोल्हेगाव येथील महानगर प्राथमिक शाळेत एमआयडीसी मधील कामगार वर्गाची मुले शिक्षण घेत आहे. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून शाळेला सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहे. इनरव्हीलच्या हॅपी स्कूल उपक्रमातंर्गत मागील वर्षी 101 शाळा दत्तक घेण्यात आल्या होत्या. या उपक्रमाचे गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. सदर शाळा देखील क्लबच्या वतीने दत्तक घेण्यात आले असून, शाळेला कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे तब्बल 80 हजार रुपया पर्यंतची मदत देण्यात आलेली आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मेडिकल रुप उभारण्याचा क्लबचा मानस असून, त्याची सुरुवात या मदतीच्या धनादेशाद्वारे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सोनाली वहाडणे म्हणाल्या की, कामगार वर्गाची मुले सुशिक्षित झाल्यास त्यांचे उज्वल भवितव्य घडणार आहे. स्पर्धेच्या युगात मनपा शाळेतील मुले टिकण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेला आधार देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
