• Wed. Feb 5th, 2025

अखेर चिचोंडी पाटीलच्या सरपंचाने कारवाईच्या भितीने हटविले दावणचे अतिक्रमण

ByMirror

Feb 1, 2025

कोकाटे यांच्या आंदोलनाला यश

इतर अतिक्रमणे देखील हटविण्याची व अतिक्रमणाचा पुरावा नष्ट केल्याबद्दल सरपंचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटीलचे सरपंचाने कारवाईच्या भितीने अखेर 2020 साला पासून रस्त्यावर केलेले दावणचे अतिक्रमण हटविले आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोकाटे यांनी माहिती दिली.


2020 साला पासून सदरचे अतिक्रमण काढण्याचा अर्ज केल्यानंतर दिलीप कोकाटे यांना चिचोंडी पाटीलच्या सरपंचाने चार चाकी गाडी खाली मारण्याचा प्रयत्न केला आहे. अतिक्रमण काढून टाकण्याचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळे कोकाटे व त्यांना साथ देणारे सुधीर भद्रे यांच्या जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्यासह सरपंचाने केलेले आनखी काही अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून केलेला अतिक्रमणाचा पुरावा नष्ट केल्याबद्दल सरपंचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


2020 साली दिलीप कोकाटे यांनी तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच शरद पवार यांनी त्यांच्या राहत्या बंगल्याच्या सार्वजनिक रस्त्यावर ताबेमारी करून जनावरांसाठी दावण बांधली होती. ग्रामपंचायतीने तयार केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर जनावरे बांधून येणाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता. ही दावण काढून टाकून गावातील जनतेला रस्ता खुला करून द्यावा, असा अर्ज दिलीप कोकाटे यांनी ग्रामविकास अधिकारी चिचोंडी पाटील, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास मंत्री यांच्या कडे केला होता.


अनेकदा लेखी पत्र व्यवहार करूनही राजकीय दबावापोटी प्रशासन कसलीही कारवाई करत नसल्याने कोकाटे यांनी नुकतेच 24 जानेवारी रोजी जिल्हा परिषद समोर चार दिवसीय उपोषण केले होते. या उपोषणास भारतीय जनसंसदेचे जिल्हा अध्यक्ष सुधीर भद्रे यांनी देखील पाठिंबा देऊन उपोषणात सहभाग नोंदवला होता.


गटविकास अधिकारी शरद मगर यांनी सहाय्यक गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी चिचोंडी पाटील येथील बेकायदेशीर अतिक्रमणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत पत्र दिल्यामुळे कोकाटे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. चौकशी अधिकारी सोनकुसळे यांनी 29 जानेवारी रोजी सरपंच शरद पवार यांच्या अतिक्रमणाची पाहणी केली सोनकुसळे येऊन गेल्यानंतर रात्रीतून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेली दावण काढून टाकण्यात आली. सरपंच पद जाण्याच्या भितीने दावण काढल्याची दबक्या आवाजात गावभर चर्चा असल्याचे कोकाटे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *