• Thu. Jul 31st, 2025

ढवळपुरीत अनाधिकृतरित्या मुरूम उत्खनन प्रकरणी अखेर लाखोंचा दंड

ByMirror

Jul 9, 2025

7 दिवसात दंड जमा करण्याचे पारनेर तहसीलदार यांचे आदेश

नगर (प्रतिनिधी)- अनाधिकृतरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी ढवळपुरी (ता. पारनेर) येथील गट नंबर 311 व गट नंबर 184 मधील जमीन मालकांवर 69 लाख व 3 लाख 46 हजार रुपयाची दंडात्मक कारवाईचा आदेश पारनेर तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गायत्री सैंदाणे यांनी काढला आहे.


या कारवाईने अवैध गौनखनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदर दंडाची रक्कम 7 दिवसात शासनाकडे जमा करावी अन्यथा सदरची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 176 व 182 नुसार स्थावर जंगम मालमत्ता जप्त करून वसूल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


28 एप्रिल रोजी तलाठी ढवळपुरी यांनी राजेंद्र बाबुराव शेवंते यांच्या मालकीच्या गट नंबर 311 मध्ये समक्ष पाहणी करून अनाधिकृत रित्या 550 ते 600 ब्रास मुरूम उत्खनन करून साठा केल्याचे दिसून आले. तर भागाजी नारायण चौधरी यांच्या मालकीच्या गट नंबर 184 मध्ये 25 ते 30 ब्रास उत्खनन केल्याचे आढळले. याप्रकरणी दंड आकारण्यासंदर्भात नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला होता. याप्रकरणी सादर करण्यात आलेला खुलासा संयुक्तिक नसल्याने सदर खुलासा फेटाळून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.


तहसीलदार पारनेर यांनी जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश 12 जून 2015, महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजाचे उत्खनन व ती काढणे) सुधारणा नियम 2017, दि. 12 जानेवारी 2018 मधील तरतुदीनुसार दंड ठोठावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *