पावणे दोन कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी फरांडेला बडतर्फ करा -विनायक गोस्वामी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत खातेदाराने तेथील क्लार्क, तत्कालीन शाखाआधिकारी सदाशिव फरांडे यांच्याशी संगनमत करून चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर करत राज्य शासनाचे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विनायक गोस्वामी यांनी दिली.
सविस्तर माहिती अशी की 6 महिन्या पूर्वी कर्जत पोलीस स्टेशनला खातेदार विशाल मधुकर पवार (रा. कर्जत) व एका लिपिकावर फसवणुकीचा गुन्हा सैनिक बँक आधिकारी संजय कोरडे यांनी दाखल केला. जिओ डिजिटल फायबर व टेलीसोनिक नेटवर्क या दोन कंपन्यांनी दिलेल्या 10 डी.डी./पे ऑर्डर च्या क्लिअरिंगमध्ये अफरातफर करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले होते. हा गुन्हा दाखल करताना संजय कोरडे यांनी तत्कालीन शाखाअधिकारी सदाशिव फरांडे व दोन लिपकांना आर्थिक तडजोडीतून वगळले होते. त्यावर सभासदांनी लेखापरीक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार लेखापरीक्षण झाले व त्या लेखापरीक्षनात सदाशिव फरांडे व 2 क्लार्क जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार निकम यांनी फरांडे व दिपक पवार, रामचंद्र नेटके क्लार्क गुन्ह्यात सह आरोपी असल्याची तक्रार दिली. त्यातुन निर्दोष असलेले दोन लिपिक यांना वगळून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. फरांडे सध्या फरार आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
या गुन्ह्यात जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल होऊन बडतर्फ करण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा सभासद कॅप्टन विठ्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, संचालक सुदामराव कोथींबीरे, बबनराव दिघे, विक्रमसिंह कळमकर, मेजर संपत शिरसाठ, अशोक गंधाक्ते, वैभव पाचरणे यांनी दिला आहे.
व्यवहारे, कोरडे यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा -विनायक गोस्वामी
सहकार विभागाच्या विनिर्दिष्टत अहवालात शाखाअधिकारी सदाशिव फरांडे दोषी निघाला. यापूर्वी त्याच्यावर संजय गांधी निराधार योजनेतील अपहाराचा ही दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या काळया कृत्यात व्यवहारे, कोरडे सामील आहेत त्यामुळेच त्याच्यावर बँकेने निलंबनाची जुजबी कारवाई केली आहे. अनेक घोटाळे करणाऱ्या फरांडे याला बँकेतून बडतर्फ करावे व सदर चेक प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, चेअरमन शिवाजी व्यवहारे व संचालक मंडळ यांच्यावर हेतूपुरस्सर दिरंगाई, फरांडेला पाठीशी घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, अक्षम्य चूक व कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर, संगनमत केल्याचा ठपका ठेवत त्यांची चौकशी करण्याची गरज असल्याचे विनायक गोस्वामी यांनी म्हंटले आहे.
वरिष्ठांच्या पाठबळावर फरांडेचे गैरव्यवहार !
सदाशिव फरांडे याने संजय कोरडे, शिवाजी व्यवहारे, व काही संचालकाच्या आर्थिक संबंधापायी बँकेत घोटाळे केले. एव्हडे घोटाळे करूनही त्याला व्यवहारे,कोरडे यांनी गेली 10 वर्षापासून कर्जत शाखेत ठेवले. त्यामूळे त्याने असुरक्षित कर्ज वाटप करून त्यातून आर्थिक कमाई केली व त्यातील हिस्सा तो पाठबळ देणाऱ्यानां देत असणार. शेवटी अति तिथे माती या उक्ती प्रमाणे फरांडे कायद्याच्या कचाट्यात सापडला असून त्याला पोलिसांनी जलद अटक करावी. जेणे करून त्याने कोणाच्या सांगण्यावरून अफरातफर केली हे स्पष्ट होणार असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली आहे.