मौजे बांगार्डेच्या ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेत उपोषण
चोरी असूनही कारवाई नाही; दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरी प्रकरण
नगर (प्रतिनिधी)- मौजे बांगार्डे (ता. श्रीगोंदा) येथील दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरून नेल्याच्या प्रकरणात संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल करुन आरोपींना पाठिशी घालणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रारदारांसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत उपोषण केले.
या उपोषणात माजी सरपंच घनश्याम शेळके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, बसपाचे सुनिल ओव्हळ, नितीन जावळे, अंबादास घोडके, विक्रम शेळके, राजू शिंदे, शहानवाज शेख आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. या आंदोलनास बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
मौजे बांगार्डे येथे तक्रारीनुसार, पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप एका व्यक्तीने चोरून नेऊन स्वतःच्या गोठ्यात वापरले होते. याबाबत पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या आदेशानुसार पंचनामा देखील करण्यात आला. यानंतर संबंधित आरोपी दिनकर शेळके याने सदर पाईप ग्रामपंचायतीकडे परत केले. मात्र शासकीय मालमत्तेची चोरी स्पष्ट असूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
तक्रार, उपोषण व आंदोलने करूनही ग्रामसेवक व सरपंच यांनी आरोपीला पाठीशी घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. गावात या प्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याचीही चर्चा रंगली आहे. गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनीही याप्रकरणी कारवाईसाठी सूचना व लेखी पत्रे दिली आहेत. तरी देखील गुन्हा दाखल होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामपंचायतीवर व ग्रामसेवकांवर पक्षपाती कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करून, शासकीय मालमत्ता चोरल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.