तक्रार घेऊन गेलेल्यांना पोलीस स्टेशनमधून हुसकावणाऱ्या तोफखाना पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी
चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- चर्मकार समाजाबद्दल मुंब्रा (ठाणे) येथील नदीम खाने याने दोनदा अवमानकारक वक्तव्य केल्याचा चर्मकार विकास संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. सदर आरोपीवर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल न करता, समाजाच्या शिष्टमंडळास अपमानास्पद वागणुक देऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर काढणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करावे व चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी संबंधीत व्यक्तीवर समाजाच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि ॲट्रॉसिटीचे कलम लावण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.27 जानेवारी) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, रुपेश लोखंडे, आरुण गाडेकर, दिनेश देवरे, संतोष कांबळे, नागनाथ काजळकर, भानुदास नन्नवरे, गणेश लव्हाळे, भगवान काजळकर, एकनाथ नन्नवरे, जयहिंद काकडे, ओम पीडीयार, रामेश्वर महापुरे, भिकाजी वाघ, अंबादास गुजर, माणिक लव्हाळे, मच्छिंद्र हिरे, गजानन बागडे, ज्ञानेश्वर वाघमारे, दिलीप तावरे आदींसह पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंब्रा (जि. ठाणे) येथील नदीम खान या व्यक्तीने सिने अभिनेता सैफअली खान यांच्यावर हल्ला प्रकरणी सोशल मीडियावर वक्तव्य करताना चर्मकार समाजाचा अवमान करून जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केलेले आहे. यामुळे समस्त चर्मकार समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. या संदर्भात चर्मकार समाजात तीव्र भावना उमटत आहे. त्या युवकाने चर्मकार समाजाबद्दल दुसऱ्यांदा अवमानकारक वक्तव्य केलेले आहे. या संदर्भात चर्मकार विकास संघाचे शिष्टमंडळ तोफखाना पोलीस स्टेशन येथे संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासाठी गेले होते. पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी मुंबई येथे जावून हा गुन्हा दाखल करा, तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होणार नसल्याचे स्पष्ट करुन मुजोरीची भाषा केली. पोलीस स्टेशनला आलेल्या संघटनेच्या प्रतिनिधींना पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलून देत त्यांना अपमानजनक वागणुक देण्यात आली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
चर्मकार समाजाबद्दल मुंब्रा (ठाणे) येथील नदीम खान या व्यक्तीवर समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करावा व गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या समाजाच्या प्रतिनिधींना अपमानजनक वागणुक देवून त्यांना पोलीस स्टेशन मधून हुसकावून देणाऱ्या तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्या निलंबनाची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. तोफखाना पोलीस स्टेशनला फक्त हप्तेखोरी व एजंटगिरी करणाऱ्यांची वर्दळ असते. सर्वसामान्य तक्रार घेऊन गेल्यास त्याला हुसकावून लावण्यात येते. येथील पोलीस निरीक्षकांचे कार्य वादग्रस्त ठरलेले असून, अनेकवेळा त्यांनी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांची तक्रार न घेता, त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढले आहे. तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे व गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे निलंबन करुन पोलीस स्टेशनला चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणुक होणे आवश्यक आहे. -संजय खामकर (प्रदेशाध्यक्ष, चर्मकार विकास संघ)