भीतीपासून शांत-कौतुकापर्यंतचा प्रवास म्हणजे वडील -प्रसाद आंधळे
नगर (प्रतिनिधी)- वडिलांना घरी येऊ द्या, मी त्यांना सांगेन! तुम्ही काय केले? या आईच्या वाक्याने सर्वच मुला-मुलींचा थरकाप उडतो. बहुतेक बालपण आईच्या मायेत जाते. पण त्या अबोल प्रेमाला वडिलांच्या जिव्हाळ्याची सावली असते. भीतीपासून शांत-कौतुकापर्यंतचा प्रवास म्हणजे वडील असल्याचे प्रतिपादन इंजिनिअर प्रसाद आंधळे यांनी केले.
ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फादर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात आंधळे बोलत होते. संस्थेच्या संचालिका वैशालीताई कोतकर, उद्योजक गणेश सातपुते,गवळी सर, दारकुंडे मॅडम, जोशी मॅडम, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठया उपस्थित होते.
पुढे आंधळे म्हणाले की, लहानपणाची वडिलांची भिती नंतर आदर व प्रेमात रूपांतरित होते. वडिल मुला-मुलींचे एक चांगले मित्र बनतात. फादर्स डे आपल्या वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असून, यातून मुलांमध्ये वडिलांचा त्यांच्यासाठी असलेला त्याग, प्रेम आणि कष्टाची जाणीव करुन देणारा दिवस ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या संचालिका वैशालीताई कोतकर यांनी फादर्स डे च्या शुभेच्छा देवून विद्यार्थी-पालकांनी एकमेकांशी संवाद साधून मैत्रीपूर्ण नाते निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गवळी यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित पालक कारखिले, हरिदास शिंदे, पांडुरंग शिंदे, स्वरूप काळे, आबासाहेब नेहूल यानी ओएसिस स्कूलच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी वडिलांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. आभार खान यांनी मानले.