बाप-लेकाच्या डोळ्यात तरळले अश्रू
मानसिक उपचार व समुपदेशनाने केले पुनर्वसन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व 25 वर्ष गुलामीत दिवस काढणाऱ्या दत्तात्रय नागनाथ कराळे आणि मानसिक विकलांगतेने 23 वर्ष वेठबिगार म्हणून राबवून घेतलेल्या लल्लन चोपाल यांची वेठबिगारीतून मुक्तता झाल्यानंतर श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करुन त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले. दत्तात्रय व त्यांचा मुलगा सोमनाथ कराळे या पिता-पुत्राची तब्बल 25 वर्षानंतर भेट घडवून आणण्यात आली. बाप-लेकाच्या या भेटीने दोघांसह उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. तर लल्लन चोपाल याला देखील त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील दत्तात्रय नागनाथ कराळे हे 25 वर्षापासून मानसिक आजाराने त्रस्त असताना अचानक घर सोडून निघून गेले. तर लल्लन चोपाल हा अहमदाबाद येथून हरवला होता. त्यांच्या मानसिक विकलांगतेचा गैरफायदा घेत काही लोकांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने मारहाण करीत वाटेल ते काम करुन घेऊन घेतले. या दोघांना बेलवंडी पोलीसांनी वेठबिगारीतून मुक्त केले. त्यांना पुढील काळजी, संरक्षण, उपचार आणि पुनर्वसनासाठी 19 डिसेंबर 2023 रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले होते.
मानवसेवा प्रकल्पात अन्न, वस्त्र निवाऱ्यासह मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार करण्यात आले. इंटरनॅशनल जस्टीस मिशन मुंबईच्या लिला नंदा, श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाने संस्थेचे स्वयंसेवक सिराज शेख, पुजा मुठे, सोमनाथ बर्डे, अंबादास गुंजाळ, मंगेश थोरात, ऋतिक बर्डे, मथुरा जाधव, स्वप्नील मधे, सुशांत गायकवाड यांनी समुपदेशन करुन त्या व्यक्तींचे कुटुंब शोधले. संस्थेच्या स्वयंसेवक सिराज शेख व ऋतिक बर्डे यांनी श्रीगोंदा दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने आणि बेलवंडी पोलीसांच्या साक्षीने दत्तात्रय कराळे आणि ललन चोपाल यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देऊन त्यांचे पुनर्वसन केले.
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने तब्बल 25 वर्षानंतर पिता-पुत्राची भेट घडवून आणली. बाप-लेकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. श्रीगोंदा दिवाणी न्यायालयाच्या आवारात बाप-लेक मनसोक्त गप्पा मारत होते. वडीलांच्या भेटीने मिळालेला आनंद गगनात मावेनासा झाला होता.
गेली 25 वर्षे मी अनाथ म्हणून जगत होतो. वडील मिळाल्यामुळे आज तो कलंक पुसला गेला आहे. मानवसेवामुळे वडिल भेटले व कुटुंबात पुन्हा वडिलांना सन्मानाने घेऊन जाता आले. -सोमनाथ दत्तात्रय कराळे