• Tue. Jul 22nd, 2025

जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर होण्यासाठी उपोषण

ByMirror

Feb 12, 2024

गोर-गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी भारतीय जनसंसदचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर कराव्या, या मागणीसाठी भारतीय जनसंसदच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात भारतीय जनसंसदेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सब्बन, बबलू खोसला, वीर बहादूर प्रजापती, रईस शेख, पोपटराव साठे, प्रमोद वाघमारे, अनिल पवार, हबीब पठाण, दत्ता तांबे, सुधीर भद्रे आदी सहभागी झाले होते.


जिल्हा रुग्णालय मध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषत: रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची योग्य व्यवस्था नाही, एक्सप्रेस फोल्डर चे बिल भरत नसल्यामुळे वारंवार विजेची समस्या निर्माण झाल्याने तातडीच्या आरोग्य सुविधा पुरविण्यात मोठ्या अडचणी येतात. अशा अनेक प्रशासकीय गैरसोयीमुळे योग्य सक्षम अशी आरोग्य सुविधा गोरगरीब नागरिकांना उपलब्ध होत नसल्याचे भारतीय जनसंसदच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पडिक असलेली धर्मशाळा दुरुस्त करून रुग्णांचे नातेवाईकांना राहण्यासाठी योग्य ती सोय करावी, जिल्हा रुग्णालयांमध्ये एक्सप्रेस फोल्डरचे थकीत बिल भरून जिल्हा रुग्णालय भारनियमन मुक्त करावे, बाहेर असलेला नेत्र कक्ष विभाग जिल्हा रुग्णालयाच्या आतमध्ये सुरु करावा, डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावे व त्याचे स्क्रीन आर.एम.ओ. यांच्या केबिनमध्ये बसविण्यात यावे, ओपीडी मध्ये सर्व डॉक्टर सकाळी 8:30 ते 12:30 वाजेपर्यंत पूर्ण वेळ उपस्थित असावे. नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांची पूर्वीप्रमाणे असलेली बसण्याची जागा पुन्हा त्या ठिकाणी करण्यात यावी, मुख्य प्रवेशद्वारातील खराब झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *