दहिगावने ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे दहिगावने (ता. शेवगाव) येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले. तर स्मशान भूमीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या त्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली.
सचिन खंडागळे, अशोक दळवी, आदिल पठाण यांनी केलेल्या उपोषणाला बहुजन मुक्ती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव आल्हाट, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, कास्ट्राईब संघटनेचे बन्सीभाऊ घोडेराव, आदिवासी भटक्या विमुक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव सावंत, छावा संघटनेचे सचिव विनोद साळवे, आसरा बालसदनचे सचिव जॉनराव मगर यांनी पाठिंबा दिला.
मौजे दहिगावने (ता. शेवगाव) येथील ग्रामपंचायत पासून विशिष्ट गटाच्या ताब्यात राहिलेली आहे. गावाच्या विकासाच्या नावाखाली अनेक वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. आज पर्यंत कोणीही भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवलेला नसून, आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर दडपण आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना विरोध केल्याने काही समाजातील लोकांना हाताशी धरून आम्हाला धमकवण्याचा प्रकार सुरू आहे. शेवगाव पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी देखील उडवाउडवीची उत्तरे देऊन जिरवण्याची भाषा करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
ग्रामपंचायत सदस्याने स्मशान भूमीच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे. त्या सदस्याचे सभासदत्व रद्द होण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करून देखील याबाबत चौकशी झालेली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट करुन या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.