महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन त्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपोषणात राज्य प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश घोळवे, राज्य उपाध्यक्ष काशिनाथ पाचंगे, राज्य कार्याध्यक्ष संजय पाचुंदकर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष उमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, प्रकाश थोरात, बाबासाहेब महापुरे, रीयाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब डोळस, महिला जिल्हाध्यक्षा अलकाताई झरेकर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रेरणा धेंडे, दीपक साळवे, अमोल झेंडे, संदीप चव्हाण, अनिल पठारे, दिपक दिवटे, जगदीश आंबेडकर, शांताबाई आंबेडकर, एकनाथ राऊत आदी सहभागी झाले होते.
रोहयो (कार्य विभाग) व सार्वजनिक बांधकाम विभागच्या माध्यमातून जिल्ह्यातील महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र सर्वत्र रस्ते खड्डेमय झालेले असून, अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती कामे झालेली नाही. 2022-23 मध्ये अनेक बोगस बिले काढण्यात आली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
दुरुस्ती कामात झालेल्या गैरव्यवहारामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
निधीमध्ये अपहार होत असल्यामुळे रस्त्याचे काम रखडले असल्याचा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.