• Sun. Jul 20th, 2025

देहरेच्या ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी उपोषण

ByMirror

Dec 30, 2023

भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला मिळावा, सर्विस रोड व भुयारी मार्गाचे काम मार्गी लावण्याची मागणी

तर गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी गावात उपसरपंच दिपक जाधव यांनी ग्रामस्थांसह उपोषण सुरु केले आहे. शनिवारी (दि.30 डिसेंबर) उपोषणाचा तिसरा दिवस उलटून देखील उपोषणाची दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांनी उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.


तहसिलदार संजय शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रलंबीत प्रश्‍ना संदर्भात ठोस आश्‍वासन मिळत नसल्याने उपोषण सुरु ठेवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी उपोषणाची तातडीने दखल न घेतल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नगर-मनमाड महामार्गावर बसण्याचा इशारा दिला आहे.


देहरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी सन 1995 मध्ये भूसंपादन करण्यात आले होते. परंतु आज 25 वर्षे उलटून देखील संबंधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात व आजही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयांना खेटा घालावा लागत आहे. यामध्ये गरीब शेतकऱ्यांचा मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ होत आहे.
राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय मार्गावर उड्डाणपूल झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी सर्विस रोड करुन देणे बंधनकारक असते. परंतु देहरे गावासाठी असा कोणत्याही प्रकारचा सर्विस रोड करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे 30 वर्षानंतर देखील ग्रामस्थांना रस्त्याच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध धंद्यामुळे स्थानिक तरुण वाम मार्गाला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करुन देखील गावातील अवैध धंद्यांवर कारवाई न करता दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.


देहरे येथीलउड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वे गेट बंद करण्यात आले. त्यानंतर एका कंपनीने नगर कोपरगाव रस्त्याचे काम घेतले. त्यावेळी देहरे भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. रेल्वे खालुन भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे अवघड काम रेल्वेने सन 2000 सालीच पूर्ण केले. परंतु रस्त्या खालून भुयारी मार्गाचे संबंधित कंपनीने आश्‍वासन देऊनही काम पूर्ण केलेले नाही. आजच्या स्थितीला रेल्वेचे दुहेरी मार्गाचे काम सुरु असून रेल्वेमुळे गावाचे दोन भाग झाले आहेत. गावाच्या पश्‍चिम भागात आरोग्य केंद्र, हायस्कुल, महाविद्यालय, बॅक, प्राथमिक शाळा, गावठाण ही महत्त्वाची केंद्र आहेत. तर पूर्व भागात दुध डेअरी, मेडिकल, बस स्टॅण्ड अशी केंद्र असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


देहरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी सन 1995 मध्ये भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला मिळावा, ग्रामस्थांच्या सोयीसाठी सर्विस रोड करावा, तरुण व्यसनाच्या आहारी जात असताना पोलीस प्रशासनाने गावातील अवैध धंदे बंद करावे, मनीषा कन्स्ट्रक्शनने दिलेल्या आश्‍वासना प्रमाणे देहरे येथील भुयारी मार्ग करून देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या उपोषणात व्हि.डी.काळे, भानुदास भगत, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रमेश काळे, संजय शिंदे, उत्तम काळे, मेघनाथ धनवटे, दत्तात्रय लांडगे, दत्तात्रय काळे, संदीप काळे, भाऊसाहेब ढोकणे, अर्जुन काळे, अमोल बानकर, प्रदीप कोळपकर, माजी सरपंच अब्दुल खान, सुभाष खजिनदार, डॉ. अनिल लांडगे, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पटारे, आप्पासाहेब शिंदे, अमोल जाधव, भानुदास भगत सहभागी होऊन पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *