आयकर विभागाकडे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
मोठ्या प्रमाणात माया जमवल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथील अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्वस्ताच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पुणे गुलटेकडी येथील आयकर विभागाच्या कार्यालया समोर उपोषण केले. त्या विश्वस्ताच्या संपत्तीची चौकशी होत नसल्याने रोडे यांनी उपोषण सुरु केले आहे.
अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान विश्वस्ताने मेहेरबाबांच्या नावाखाली देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती गोळा केलेली आहे. या पैश्यातून अरणगाव, केडगाव येथे मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. जमीनीच्या खरेदीसाठी पैशाचा स्त्रोत काय वापरण्यात आला याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्वस्ताच्या कुटुंबीय व जवळच्या नातेवाईकांनी अरणगाव परिसरात कोटयावधी रुपयांच्या बंगल्यांचे काम केलेले आहे. अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांना ट्रस्टच्या माध्यमातून कुठलेही मानधन नाही व त्यांचा कुठलाही व्यवसाय व्यवसाय नाही. उत्पन्नाचे ठोस असे कुठलेही स्त्रोत नसताना मोठ्या प्रमाणात माया जमवल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
देश-विदेशातून प्राप्त झालेल्या निधीचा खरोखरच संस्थेच्या कामासाठी वापर करण्यात आला की, या पैश्याचा वापर कुटुंबियांसाठी व जवळच्या नातेवाईकांसाठी करण्यात आला, याची चौकशी करण्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्वस्त आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.