विविध सामाजिक संघटना व पर्यावरण प्रेमी संस्थांचा पाठिंबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण रक्षक उपक्रमाचे विधेयक राज्य व केंद्र शासनाकडून मंजूर होण्याच्या मागणीसाठी पर्यावरण विकास संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाला चालना देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पर्यावरण विकास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांच्या पुढाकाराने झालेल्या उपोषणात विविध सामाजिक संघटना व पर्यावरण प्रेमी संस्थांच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला. या उपोषणात फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बुरुडे, समता परिषद तालुका अध्यक्ष रामदास फुले, जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, वृक्ष मित्र अंबादास कांडेकर, भाऊसाहेब मोरे, गोरक्ष बढे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, महेश देवकाते, विष्णू ढवळे, नवनाथ बोरुडे, पोपट पटारे, निलेश साठे, रवींद्र बोरुडे आदी सहभागी झाले होते.
केंद्र शासन मान्यताप्राप्त पर्यावरण विकास संस्था व राष्ट्रीय पोलीस मित्र यांच्या माध्यमातून भारतभर पर्यावरण रक्षक उपक्रम राबविले जातात. पर्यावरण रक्षणासाठी एक झाड एक विद्यार्थी, कुऱ्हाड बंदी, प्लास्टिक बंदी, व्यसन बंदी, हुंडा बंदी, लोटाबंदी, आकडा बंदी, खाजगी सावकारकी बंदी, भ्रष्टाचार बंदी, तंटाबंदी, विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत आदी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. या प्रकारच्या समाज प्रबोधनवर सुरु असलेले व पर्यावरण रक्षणाचे उपक्रम गतीमान करण्यासाठी विधेयकाची आवश्यकता आहे. या प्रकल्पाची शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्यास पर्यावरण रक्षक नागरिक तयार होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व पर्यावरण विकासाच्या माध्यमातून राबविले जाणारे पर्यावरण रक्षक उपक्रम राबविण्यासाठी विधेयक त्वरित मंजूर करण्याची मागणी पर्यावरण विकास संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.