• Tue. Jul 22nd, 2025

शेतीचा रस्ता अडविल्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांचे उपोषण

ByMirror

Mar 11, 2024

शेतात पिकवलेला ऊस कारखान्यात घेवून जाण्यास पोलीस बंदोबस्त मिळण्याची मागणी

वहिवाटीचा रस्ता आदेश होवून देखील बंद खुला होत नसल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतीच्या वहिवाटीचा रस्ता बंद केलेला असताना, शेतात पिकवलेला ऊस कारखान्यात गाळपासाठी घेवून जाण्यास पोलीस बंदोबस्त मिळण्याच्या मागणीसाठी औटेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. तर वहिवाटीचा रस्ता अडविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करुन पोलीस प्रशासन बंदोबस देण्यास टाळाटाळ करत असून, महसूल प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या उपोषणात राजेंद्र औटी, धनंजय औटी, शिवाजी राऊत, दिलीप औटी, लक्ष्मण सप्रे, सुनील ओहळ, गुलाब पवार, भाऊसाहेब डांगे आदी सहभागी झाले होते.


औटेवाडी (ता. श्रीगोंदा) येथे शेतजमीन गट नंबर 1344/1 मध्ये चार एकर क्षेत्रात जाण्या-येण्यासाठी असलेला वहिवाटीचा रस्ता पांडुरंग औटी व इतर 13 जणांनी बंद केला आहे. त्यामुळे स्वत:च्या शेत जमीनीत जाण्याचा रस्ता राजेंद्र औटी व धनंजय औटी यांना बंद झाला आहे. शेतात जाऊ नये म्हणून, वेगवेगळ्या प्रकारे अडथळा निर्माण करण्याचे काम केले जात आहे. रस्ता बंद करणाऱ्यांचे राजकीय वरदहस्त असल्याने या संदर्भात दखल घेतली जात नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


श्रीगोंदा तहसीलदार यांच्याकडे रस्ता खुला करुन देण्यासाठी प्रकरण दाखल करण्यात आले होते. यावर सुनावणी होवून विनातक्रार खुला करून देण्याचे आदेश झालेले आहे. परंतु रस्ता अडविणारे आदेशाला जुमानत नसून, रस्ता खुला करून देण्यास आडकाठी आनत आहे.

रस्ता बंद असल्याने शेतात पिकवलेला ऊस कारखान्यात गाळपाला घेवून जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात तहसिलदार यांच्याकडून मनाई आदेश असताना सुध्दा समोरील व्यक्ती सहजासहजी ऊस कारखान्यास घेवून जाण्यास अडथळा आनत आहे. यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून रीतसर पोलीस विभागाकडे अर्ज करुन देखील पोलिसांनी अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. ऊस पूर्णपणे कारखान्यात जाण्यासाठी तयार असताना कारखाने बंद होण्याच्या आत ऊस गाळपाला गेल्यास होणारे मोठे आर्थिक नुकसान टाळता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


शेती शिवाय इतर कोणताही उत्पन्नाचा मार्ग नसल्याने होणारे आर्थिक संकट टाळण्यासाठी शेतीत पिकवलेला ऊस कारखान्यात गाळपासाठी घेवून जाण्यास पोलीस बंदोबस्त मिळावा व रस्ता अडविणाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *