विद्यार्थ्यांनी चांगले, वाईट ओळखायला शिकावे -पो.नि. प्रताप दराडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगले, वाईट ओळखायला शिकावे. सोशल मीडियाचा वापर योग्य गोष्टींसाठी करुन शिकत रहावे. ध्येय प्राप्तीसाठी स्वतःला झोकून द्या. स्वतःचे चारित्र्य जपा व समाजातील वाईट प्रवृत्तीपासून लांब रहाण्याचा सल्ला कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून दराडे बोलत होते. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी फुलांच्या आकारात उभे राहून व स्वागत गीताने प्रमुख पाहुणे व दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संस्थेचे दिवंगत प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया व स्व.शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. देवयानी साळुंखे या विद्यार्थिनीने पाहुण्यांचा परिचय करून दिला.
छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता, त्यांचा सर्वांगीन विकास साधण्याचे ध्येय घेऊन संस्था कार्य करत आहे. या शाळेतील अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. शिक्षणाच्या स्पर्धेबरोबरच जीवनाच्या स्पर्धेत टिकण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करण्याचे काम शिक्षक वर्ग करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सहकार्यवाह गौरव फिरोदिया व विश्वस्त सुनंदा भालेराव यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात दहावीतील विद्यार्थिनी सृष्टी मईड, सई मनविलकर, वैभवी शिंदे, भक्ती सोनार, सिद्धी मते यांनी आपले विचार व्यक्त करून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाच्या अध्यापिका विद्या यादव यांनी विचार व्यक्त केले.
विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी संकटावर शांत व आत्मविश्वासाने मात करून यश प्राप्तीसाठी सातत्याने पुढे जावे. शाळेची ही इयत्ता दहावीची 29 वी बॅच असून, गुणवत्तेत देखील वाढ होत असल्याचे कौतुक केले. संस्थेचे सदस्य भूषण भंडारी यांनी आपल्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव द्यावा व आत्मविश्वास डगमगू न देता पुढे जाण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय विद्यार्थिनी प्रज्ञा भक्कड व सोहम जपे यांनी केले. आभार आदिती रेखी हिने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.