श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रंगली पारंपारिक विसर्जन मिरवणूक
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील शाहुनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुक रंगली होती. आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीने सर्व भाविकांचे लक्ष वेधले.
निमगाव वाघा येथील नवनाथ वारकरी संस्थेचे विद्यार्थी टाळ-मृदुंगचा गजर करीत मिरवणुकीत सहभागी झाले होते. डिजेला फाटा देऊन या पारंपारिक मिरवणुकीचा भाविकांनी आनंद घेतला. डिजेमुळे नागरिकांना होणारा त्रास, कर्णकर्कश आवाजामुळे होणारे दुष्परिणाम याची जाणीव ठेऊन महाराष्ट्राची संस्कृती जपत मिरवणुक काढण्यात आली होती. 
या मिरवणुकीने युवकांपुढे एक आदर्श ठेवला. मिरवणुकीत श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या महिलांनी फुगड्यांचा फेर धरुन व अभंग म्हणून आनंद घेतला. ही मिरवणूक शाहूनगर ते केडगाव वेशी पर्यंत काढण्यात आली होती. यावेळी मा. नगरसेवक अमोल येवले, गणेश पादिर, भास्कर भोस, तुषार बोरकर, प्रसाद नलगे, अक्षय मूनफन, चिकू साळवे, बोरुडे सर आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
