15 वर्षापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाचा गुन्ह्यात समावेश; बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
चौकशी करुन न्याय मिळण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- जातीय द्वेषातून जाणीवपूर्वक गोवंश हत्याच्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असून, इतर गुन्ह्यातही कुटुंबीयांना अडकविण्यासाठी काही राजकीय पुढारी, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी टार्गेट करत असल्याची तक्रार श्रीगोंदा येथील अतिक गुलाम हुसेन कुरेशी यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून निवसी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना अल्पसंख्यांक कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. तर या गुन्ह्यात कोणतीही चौकशी व तपास न करता तब्बल 15 वर्षापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीचे नाव देखील घेण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

याप्रसंगी अतिक कुरेशी, शहानवाज शेख, राजू खरात, प्रकाश अहिरे, सुनील ओव्हळ, माधवराव त्रिभुवन, नितीन जावळे, बाळासाहेब काते, प्रसाद खरात, दत्तात्रय सोनवणे, भीमराव आंबेडकर, अंबादास घोडके आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा येथील कुरेशी कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, 9 मार्च रोजी गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना गोवंश हत्याच्या गुन्ह्यात नाव टाकण्यात आले. तसेच आजोबा असलेले हाजी मुस्तफा कुरेशी मागील पंधरा वर्षांपूर्वी मयत असताना, देखील सदर गुन्ह्यात त्यांचे नाव टाकण्यात आले आहे. जातीय द्वेषातून संपूर्ण कुटुंबीयांना विविध गुन्ह्यात अडकवून सर्वांचे जीवन उध्वस्त केले जात आहे.
13 नोव्हेंबर रोजी ससाणे नगर येथे झालेल्या घटनेत त्या ठिकाणी भांडण सोडवण्या कामी गेले असता, त्या गुन्ह्यात देखील अतिक कुरेशी यांचे नाव गोवण्यात आले व विनाकारण जेलमध्ये टाकण्यात आले. या प्रकरणात जातीयद्वेषातून राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली एकतर्फी कारवाई करण्यात आली. पटेल वस्तीवरील लोकांना मारहाण झाल्याचे मेडिकल सर्टिफिकेट असताना देखील विरोधकांवर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे म्हंटले आहे. या सर्व बाबींची चौकशी होऊन न्याय मिळावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 मार्च रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.