स्वास्थ्य नारी अभियानांतर्गत वाळकीत महिलांची आरोग्य
महिला स्वस्थ तर परिवार सशक्त -डॉ. अनिल ससाने
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला.
हे शिबिर महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र वाळकी, युवक कल्याण योजना अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व समाज परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. शिबिरामध्ये महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्त, लघवी, रक्तदाब तसेच स्त्रीरोग विषयक सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भास्कर रणनवरे यांनी महिलांचे आरोग्य तपासले आणि गरोदर माता व नवजात बालकांच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अनिल ससाने व डॉ. आशिष टाक यांनी तपासण्या करून आवश्यक उपचार दिले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये सिस्टर वैशाली धामणे, सिस्टर अंजली शिंदे व देविदास पवार , व सर्व स्टाफ यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
शिबिरात गरोदर मातांची व लहान बालकांची तपासणी करून त्यांना योग्य उपचार तसेच औषधे देण्यात आली. यासोबतच महिलांना पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
डॉ. अनिल ससाने म्हणाले की, कुटुंबातील महिला स्वस्थ असतील तर त्या संपूर्ण परिवाराची उत्तम काळजी घेऊ शकतात. म्हणूनच महिलांचे आरोग्य चांगले असणे हे समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. निरोगी मातांमुळे सशक्त परिवार घडणार असल्याचे ते म्हणाले.