पहिले उपोषण सोडताना जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी केलेल्या उपोषणानंतर मिळालेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा माजी सैनिक सुंदर मेहेर यांनी सोमवारी (दि.24 मार्च) जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर कुटुंबीयांसह उपोषण सुरु केले आहे. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाची देखील पायमल्ली केला असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या उपोषणात मंदा मेहर, नितीन मेहेर, सीमा मेहेर सहभागी झाले होते.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत क्लार्क म्हणून असलेल्या नितीन मेहेर यांना कोणतीही पूर्व सूचना व नोटीस न देता पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना माजी सैनिक कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर 30 जानेवारी दरम्यान चार दिवसीय उपोषण केले होते. या प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांनी मध्यस्थी करुन माजी सैनिक सुंदर मेहेर यांना लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास लावले होते. जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या लेखी आश्वासनात सैनिक बँकेने पत्र कार्यालयास सादर करुन, सदरचे निलंबन रद्द करण्याबाबत येत्या संचालक मंडळ सभेमध्ये विषय घेऊन निलंबन रद्द करण्याबाबतचा ठराव घेतल्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचे म्हंटले होते.
मात्र चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा उपनिबंधक यांचे लेखी आदेश व दिलेल्या आश्वसनाची पूर्तता न करता निलंबनाची कारवाई अद्यापि रद्द केलेली नाही. मुलाचे निलंबन रद्द न केल्याने पुन्हा स्थगित केलेले उपोषण जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर करण्यात येत असल्याचे माजी सैनिक सुंदर मेहेर यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा उपनिबंधक यांच्या लेखी आदेशाचा अवमान व पायमल्ली करणारे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, बँकेचे क्लार्क असलेले नितीन मेहर यांचे निलंबन तात्काळ रद्द करून त्यांना कामावर हजर करून घ्यावे, निलंबन काळातील पगार दिवाळी बोनस शासन कामगार कायद्याप्रमाणे जमा करावे, फौजदारी कारवाई असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी माजी सैनिक सुंदर मेहेर यांनी केली आहे.