• Tue. Nov 4th, 2025

राज्यात शीख, पंजाबी आणि सिंधी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करा

ByMirror

Oct 9, 2024

समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी जिल्ह्यातील शीख, पंजाबी, सिंधी समाजाची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात शीख, पंजाबी आणि सिंधी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी जिल्ह्यातील शीख, पंजाबी, सिंधी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांना पाठविण्यात आले आहे.


महाराष्ट्र राज्यातील शीख, पंजाबी व सिंधी समाजातील काही घटक अनेक वर्षांपासून आर्थिक आणि सामाजिक प्रगती पासून वंचित राहिला आहे. या समाजातील व्यक्तींना रोजगाराच्या संधी आणि आर्थिक विकासासाठी उचित सहाय्य मिळण्याची गरज आहे. जैन आर्थिक महामंडळाच्या धर्तीवर शीख, पंजाबी आणि सिंधी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


या समाजाला स्वतंत्र महामंडळ दिल्यास त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी नवे मार्ग खुले होणार आहे. पूर्वी असलेल्या अल्पसंख्याक महामंडळात शीख आणि जैन समाजाचा समावेश होता. परंतु शीख समाजात कोणताही बदल झाला नाही आणि त्यांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही. यामुळे, जैन समाजाप्रमाणे शीख, पंजाबी आणि सिंधी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
हे महामंडळ या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. जेणेकरून त्यांना कर्ज, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या समाज विकासविषयक धोरणात शीख, पंजाबी आणि सिंधी समाजाला देखील समान संधी मिळेल. जैन समाजाला दिलेल्या या महत्त्वाच्या निर्णयानंतर शीख, पंजाबी आणि सिंधी समाजालाही स्वतंत्र महामंडळ देऊन आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी आधार मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


राज्य सरकारने तातडीने शीख, पंजाबी आणि सिंधी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे, या महामंडळाच्या माध्यमातून शीख, पंजाबी आणि सिंधी समाजातील गरजू व्यक्तींना अल्प व्याज दराने कर्ज सुविधा उपलब्ध कराव्या, शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या, समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ द्यावा, समाजातील महिलांसाठी विशेष आर्थिक योजनांची अंमलबजावणी करावी, समाजातील काही मंडळी शेती करीत आहेत, तरी त्यांना शेतीत सहाय्य होईल अशा योजना राबवाव्या, या महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असावे आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाखा स्थापन करून या योजना सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी समाजाचे हरजीतसिंग वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, लकी सेठी (श्रीरामपूर), राजेंद्र कंत्रोड, दामोदर माखिजा, कैलास नवलानी, डॉ. संजय असनाणी, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, दलजितसिंह वधवा, सनी वधवा, गुरदितसिंग नारंग, मन्नू कुकरेजा, राजेश कुकरेजा, राहुल बजाज, सिमरजीतसिंग वधवा, अनिल जग्गी, राजेंद्र जग्गी, जतीन आहुजा आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *