जागतिक दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शन व परिषदेत होणार सहभागी
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील आमी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तैवान (विदेशी) अभ्यास दौऱ्यासाठी उद्योजक रवाना झाले आहेत. तैवान येथे टिमटोस-24 या औद्योगिक प्रदर्शन व परिषदेत शहरातील उद्योजक सहभागी होणार असून, यामध्ये नव-नवीन मशनरी, सॉफ्टवेअर तसेच जगातील नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली जाणार आहे.
यशस्वी उद्योजक निर्माण करुन, औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आमी संघटनेच्या वतीने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे उद्योजकांना नव-नवीन तंत्रज्ञानाची माहिती होवून त्याचा उद्योग व्यवसायात फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांच्या भेटीने उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याची संधी या दौऱ्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांना मिळणार असल्याचे आमीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
आमी तर्फे दरवर्षी अशा अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. आज पर्यंत 8 वेळा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भरणाऱ्या औद्योगिक प्रदर्शन व परिषदसाठी नगर मधील 40 उद्योजक रवाना झाले आहे. 10 दिवसीय अभ्यास दौऱ्यात आंतरराष्ट्रीय उद्योग विश्वाची माहिती मिळून त्यांच्या सोबत व्यापाराची संधी मिळणार असल्याचे आमीचे अध्यक्ष जयद्रत खाकाळ यांनी सांगितले.
