पीपल्स हेल्पलाईनचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाही आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. जिथे निवडणूक ही केवळ सत्ताधाऱ्यांची अदलाबदल नसून, ती राष्ट्राच्या विचारधारेचा पुनर्जन्म ठरू शकते. मात्र दुर्दैवाने, मतदार धर्म-अक्कलमारी आणि मतदार जात-अक्कलमारी या संकल्पना आजही भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाव घालत आहेत. स्वार्थ, जातीयता आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या मोहजाळात अडकलेल्या मतदार मानसिकतेमुळे विद्वत्तेला, दृष्टीकोनाला आणि मूल्याधिष्ठित राजकारणाला मागे टाकले जात असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यानंतर संविधान लिहिणारे, लोकशाहीचे खरे पुरस्कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील या विकृत मतदार वृत्तीचा फटका बसला. त्यांनी आयुष्यभर दलित, वंचित आणि सामान्य जनतेसाठी लढा दिला. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत, विद्वत्ता व कार्यपेक्षा जात-धर्माच्या आधारे मतदान झाले आणि त्यांचा पराभव झाला. हे केवळ एका नेत्याचा नाही, तर लोकशाहीच्या मूल्यांचा पराभव ठरला.
राजकारण केवळ पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि कुटुंबासाठी करणाऱ्या सत्तापेंढारींनी अनेक वर्षे जनतेला बहिण-बेटी योजना, जाती-धर्माच्या नारेबाजीने भुलवलं. पण आता या खेळाचा शेवट झाला पाहिजे. भारताला नवे सरकार नाही, तर नवी राजकीय जाणीव, सजग मतदार, आणि उंचावलेली लोकशाही हवी असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
आज भारतासमोर हवामान बदल, पाण्याची टंचाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक विघटन यांसारख्या गंभीर समस्या आहेत. यावरचा उपाय आहे एकत्रित ज्ञानसिद्धांत, हा सिद्धांत विज्ञान, नीतिमत्ता, पर्यावरण, अध्यात्म आणि तर्कशक्ती यांचा समन्वय साधतो. मतदान ही केवळ एक प्रक्रिया नाही, ती एक सांस्कृतिक आणि नैतिक क्रांती असली पाहिजे. प्रत्येक निवडणूक म्हणजे एक नवीन वाटचाल ही राष्ट्राच्या मूल्यांची आणि जनतेच्या प्रतिष्ठेची परीक्षा आहे. जर मतदारांनी भीती, लोभ, जात आणि धर्माच्या पलीकडे पाहून मतदान केलं, तर भारत सुजलाम सुफलाम, निसर्गस्नेही आणि ज्ञानाधिष्ठित राष्ट्र बनू शकणार असल्याची भावना ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.
मतदानाचे मार्गदर्शक तत्त्व व सजग नागरिकांसाठी निसर्गपाल नेत्यांना मतदान करा जे निसर्ग, प्राणीमात्र आणि समाजासाठी निःस्वार्थ झटतात, रेन गेन बॅटरी क्रांतीला पाठिंबा द्या, ही कल्पना हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि जैवविविधता संकटावर उपाय शोधते, लोकभज्ञाक उमेदवारांची निवड करा, जे लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या तत्त्वांवर काम करतात. जातीय, धार्मिक आणि घराणेशाहीच्या पक्षांना नकार द्या, जे मतांची तिजोरी भरून जनतेला विसरतात, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
नव्या भारतासाठी माझं जीवन, माझं झाड, माझी रेन गेन बॅटरी…, जय किसान, जय निसर्गपाल…, मतदान हेच महादान, लोकभज्ञाकशाहीसाठी मतदान करा…! या नव्या घोषणा संघटनेच्या वतीने जारी करण्यात आल्या आहेत.