• Wed. Jul 2nd, 2025

शहरात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

ByMirror

Jun 22, 2025

जिल्हा क्रीडा संकुल झाले योगमय


जिल्हाधिकारी, सीईओ, मनपा आयुक्त व शिक्षणाधिकारी यांचा सहभाग

प्रत्येक भारतीयाने निरोगी आरोग्यासाठी योगचा स्वीकार करावा -जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
नगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी (दि.21 जून) सकाळी वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल मधील बॅडमिंटन हॉल योगमय झाला होता.


प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, मनपा आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, प्रियंका खिंडरे, क्रीडा मार्गदर्शक प्रविण कोंढावळे, संतोष वाबळे, विशाल गर्जे, वरिष्ठ लिपिक भाऊसाहेब जगताप आदींसह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले की, संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. प्रत्येक भारतीयाने निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी योगचा स्वीकार करण्याची गरज आहे. योगाने समाज निरोगी होणार होवून सक्षम व सशक्त भारताचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या योग दिनाच्या कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्रीडा संघटना, पोलीस अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी, योग साधक व खेळाडू तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी योग, प्राणायाम, ध्यानधारणाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. उपस्थित सर्व शासकीय अधिकारी यांनी देखील योग कार्यक्रमात सहभाग नोंदवून विविध आसने केली. योगमय वातावरणात डॉ. अमोल बागुल यांनी सुमधुर बासरी वादन केले. आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग संस्था, योग विद्या धाम, एमएमवायटीसी व योग संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.


पाहुण्यांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून रोपे देऊन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपस्थितांना निरोगी आरोग्यासाठी योग संकल्पाची शपथ दिली. योग दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित खेळाडू नागरिक मान्यवरांना अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आभार ज्ञानेश्‍वर खुरंगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे शैलेश गवळी, प्रशिक्षक अविनाश काळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *