गुरुवर्य महंत रामगिरी महाराजांची राहणार उपस्थिती; जागतिक पर्यावरण विकास सरकार संस्थेचा पुढाकार
“एक झाड, एक व्यक्ती”सह विविध सामाजिक उपक्रमाचा दिला जाणार संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मांजरसुंभा गड येथे गुरु गोरक्षनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा शनिवार, दिनांक 7 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यास गुरुवर्य महंत रामगिरी महाराज (सरला बेट गोधाधाम) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून, धार्मिक वातावरणात भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन लाभणार आहे.
या सोहळ्यात जागतिक पर्यावरण विकास सरकार या संस्थेच्या माध्यमातून 11,111 प्रती हनुमान चालीसांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यासोबतच 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 श्रीराम व हनुमान भक्तांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक घरामध्ये दिवसातून किमान एकदा तरी हनुमान चालीसा पठण व्हावे, यासाठी जनजागृती केली जाणार असून धार्मिक साधनेसोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश दिला जाणार आहे.
पर्यावरण रक्षण ही आजच्या काळाची अत्यंत गरज असल्याचे गोरक्षनाथ गवते यांनी नमूद केले. “आज झाडे वाचली तर सजीव सृष्टी वाचेल आणि सजीव सृष्टी वाचली तर पर्यावरण वाचेल,” असे सांगत त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली.
संस्थेमार्फत “एक झाड एक विद्यार्थी, एक झाड एक व्यक्ती” ही संकल्पना राबवली जात आहे. यासोबतच कुऱ्हाडबंदी, डीजे बंदी, हुंडाबंदी, लोटाबंदी, आकडाबंदी, खाजगी सावकारबंदी, व्यसनबंदी, तंटाबंदी, शिकारबंदी, प्लास्टिकबंदी, भ्रष्टाचारबंदी, बेरोजगारीबंदी अशा विविध सामाजिक मोहिमा राबविण्यात येत आहेत. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत, भू-प्रदूषणबंदी, जलप्रदूषणबंदी व वायूप्रदूषणबंदी या संकल्पनांद्वारे स्वच्छ, सुंदर व निरोगी भारत घडविण्याचा संस्थेचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शंकरराव कदम, जयराम कदम, गोरक्षनाथ कदम, मारुती कदम, जालिंदर कदम, तुकाराम कदम, आसाराम कदम, भाऊसाहेब कदम, भास्कर कदम, नारायण कदम, विलास भुतकर, पोपटराव पटारे, निलेश साठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
धार्मिक कार्यक्रमासोबत पर्यावरण रक्षण व सामाजिक सुधारणा यांचा संगम घडवून आणणारा हा सोहळा मांजरसुंभा गड परिसरात भक्तीभाव आणि सामाजिक जागृतीचा नवा आदर्श निर्माण करणार असल्याचेही गवते यांनी म्हंटले आहे.
