तातडीने हलविण्याची जय हिंद फाउंडेशनची मागणी; डांबरी रस्त्यालगतच विद्युत खांब; अपघाताची दाट शक्यता
खांब न हलवल्यास भविष्यातील जीवितहानीस कंपनी जबाबदार -शिवाजी पालवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जेऊर-कोल्हार रस्त्याच्या दुतर्फा सध्या विद्युत वाहक तारांचे खांब बसविण्याचे काम सुरू असून, हे खांब रस्त्यालगत अतिशय कमी अंतरावर उभारण्यात येत असल्याने प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जय हिंद फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सदर खांब रस्त्यापासून किमान 10 फूट अंतरावर हलविण्याची तातडीची मागणी करण्यात आली आहे.
जेऊर येथील वाघवाडी परिसरात असलेल्या डोंगरावर शासनाच्या माध्यमातून सोलर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारा विद्युत प्रवाह जेऊर सब-स्टेशनला जोडण्यासाठी विद्युत खांब व मुख्य विद्युत वाहक तारा टाकण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, हे खांब डांबरी रस्त्यापासून अवघ्या तीन फूट अंतरावर बसविण्यात येत असल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार, पादचारी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या खांबांवरून मोठ्या क्षमतेच्या विद्युत वाहक मुख्य तारा ओढल्या जाणार असल्याने, भविष्यात एखादा अपघात घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी, वळणाच्या ठिकाणी किंवा पावसाळ्यात अशा खांबांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढणार आहे.
याशिवाय, या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्तावही संबंधित विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यालगत उभारलेले विद्युत खांब पुढील काळात मोठा अडथळा ठरू शकतात. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करून हे खांब रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर हलविण्यात यावेत, अशी मागणी जय हिंद फाउंडेशनने केली आहे.
या मार्गावरून वाघवाडी, बहिरवाडी, उदरमल, कोल्हार, चिचोंडी शिराळ, शेवगाव व पाथर्डी आदी भागांकडे जाणाऱ्या हजारो शेतकरी बांधवांची, विद्यार्थी व नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे या रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खांब तातडीने काढण्यात न आल्यास व भविष्यात या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित विद्युत कंपनी जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या मागणीसाठी शिवाजी पालवे, राजाभाऊ दारकुंडे, शिवाजी गर्जे, मदन पालवे, पोपट पालवे, संदीप जावळे व संजय येवले यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
