कविता जगण्यातून यावी -अमोल बागुल
नगर (प्रतिनिधी)- मूळ कविता हीच खरी असते. दैनंदिन जगण्यातून सुखदुःख, संवेदना, भावभावना कवितेतून मांडताना कवी सहज होऊन जातो. टाळ्यांसाठी लिहिली जाणारी कविता, ओढून-ताणून लिहीली जाणारी कविता, मेकअप केलेली कविता असे प्रकार खऱ्या कवितेचे मारक आहे. म्हणून जगण्यातून आलेली कविता भावते आणि अंतःकरणात पोहोचते, असे प्रतिपादन कवी डॉ. अमोल बागुल यांनी केले .
एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने 36 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनामध्ये डॉ.बागुल बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून साहित्यिक राजन लाखे तर संमेलनाध्यक्ष म्हणून कवी चंद्रकांत पालवे उपस्थित होते. स्वागत बलराम मनीठे (प्रदेश सरचिटणीस युवक आघाडी) यांनी केले तर प्रास्ताविक प्रदीप बोडखे यांनी केले.
महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यांमधून निवडक कवी या काव्यसंमेलनामध्ये सहभागी झाले होते. शेती, शेतकरी, आई शाळा, पुस्तके, मराठी भाषा, हुंडा, मुली वाचवा आदी विविध विषयांवर कवींनी बहारदार काव्यरचना सादर केल्या. गेय कवितांनी कार्यक्रमाला उंचीवर नेले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड यांनी संमेलनाध्यक्ष व उद्घाटक यांचा परिचय करून दिला.नितीन कैतके यांनी सर्व कवींचा परिचय करून दिला. देविदास शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. नामदेव गीत्ते, माधवी देवळाणकर, अजित ठोंबरे, मीनाक्षी मुंडे, अजय बराटे, विठ्ठल चव्हाण, हनुमंत काळे आदी कवींनी विविध काव्यरचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.