• Wed. Feb 5th, 2025

शिक्षण विभाग, तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय!…. शिक्षकांचा प्रश्‍न

ByMirror

Jan 23, 2025

शिक्षकांवर विश्‍वास नसेल, तर त्रयस्थ यंत्रणेकडे दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा सोपवावी

अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे शिक्षण विभागाला निवेदन

त्या निर्णयाने परीक्षा काळात गोंधळ निर्माण होवून शिक्षकांची धावपळ होणार असल्याचे स्पष्टीकरण

नगर (प्रतिनिधी)- इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या नावाखाली दुसऱ्या शाळेचे केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई नियुक्तीच्या निर्णयाला अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे. तर यामुळे परीक्षा काळात निर्माण होणारा गोंधळ, शिक्षकांची धावपळ याची जाणीव करुन देणारे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर व कार्यालयीन अधीक्षक महावीर धोदाड यांना देण्यात आले.


शिक्षकांवर विश्‍वास नसेल, तर त्रयस्थ यंत्रणेकडून परीक्षा प्रक्रिया राबवून घेण्याचा इशारा शिक्षण विभागाला देण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, मिथुन डोंगरे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे महेंद्र हिंगे, जिल्हा समन्वयक वैभव सांगळे, ज्ञानदेव बेरड, ए.जी. आचार्य आदी उपस्थित होते.


फेब्रुवारी व मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक व इतर संबंधित शिक्षक, शिक्षकेतर यांची एका केंद्रातून इतर दुसऱ्या केंद्रांत बदल करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


शिक्षकांचे मनुष्यबळ अगोदरच अपूर्ण असताना इतर सर्व वर्गाच्या अध्यापनाची अडचण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. दुसऱ्या विद्यालयातून ऐनवेळी परीक्षेचे नियोजन करायला जाणारे शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी यांना शाळेची माहिती नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. काही केंद्र संचालक नवीन असल्याने गोंधळ होण्याची शक्यता आहे. महिला शिक्षकांना इतर ठिकाणी जाण्यास मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दिलेल्या परीक्षा केंद्राच्या शालेय परिसराची कर्मचाऱ्यांना माहिती नसल्यामुळे गावगुंडांकडून त्रास होण्याची शक्यता असल्याचे धोके संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.


पूर्व सूचना न देता व कोणालाही विश्‍वासात न घेता घेतलेला हा निर्णय जाचक ठरू शकतो. शिक्षक, कर्मचाऱ्यांवर अविश्‍वास असल्यास सदर परीक्षा त्रयस्थ संस्थेकडून घेण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *