• Sun. Jun 1st, 2025

अपघातात एक पाय गमावल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवतीचा सन्मान

ByMirror

Sep 12, 2023

श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या पायावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया

संकटावर मात करुन धनश्रीचा थक्क करणारा जनरल सर्जरीपर्यंतचा प्रवास

अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघातामध्ये वयाच्या 12 व्या वर्षी एक पाय गमावला, त्याच वेळी ठरवले डॉक्टर व्हायचे. मोठ्या जिद्दीने परिस्थितीवर मात करून एमबीबीएस पूर्ण करुन डॉक्टर बनलेल्या व सध्या जनरल सर्जरी चे शिक्षण पूर्ण करत असलेल्या युवतीचा प्रेरणादायी आणि थक्क करायला लावणारी ही वास्तव कथा आहे, वांबोरी (ता. राहुरी) येथील डॉ. धनश्री राजेश कोहोक हिची. नुकतेच तिचा पुन्हा अपघात होवून राहिलेल्या एका पायावर देखील फॅक्चर झाल्याने शहरातील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. जनरल सर्जन होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवतीच्या कर्तृत्वाला सलाम करुन श्रीदीप हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी तिचा सन्मान केला.


धनश्री 12 वर्षाची असताना कोहोक परिवार सन 2012 मध्ये गुजरात मधून अहमदनगर शहराकडे येत होते. त्यांचा आनंदनगर येथे मोठा अपघात झाला. यामध्ये धनश्री ही वाहनाच्या खिडकीवर फेकली गेली व दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने गेल्याने व गाडी देखील त्याच बाजूने कोसळल्याने तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी नाईलाजाने डावा पाय काढावा लागला. तर दुसऱ्या पायात रॉड टाकून हाडाची आणि त्वचेची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. या अपघातामधून वाचलेल्या धनश्रीने त्याचवेळी डॉक्टर होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले.


आपल्या ध्येयप्राप्तीसाठी जिद्दी आणि कष्टाळू धनश्रीच्या शिक्षणाचा थक्क करणारा प्रवास सुरु झाला. वांबोरी (ता. राहुरी) येथील महेश मुनोत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतले. इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर तिने एमबीबीएस ची प्रवेश परीक्षा देवून उत्तम गुण मिळवले. तिला पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तेथे एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर जनरल सर्जन होण्याचे ठरवले. कष्ट करण्याची तयारी, जिद्द व आत्मविश्‍वासाने तिने आपली पुढील वाटचाल सुरु ठेवली आणि तिचा औरंगाबाद येथील घाटी शासकीय रुग्णालयात जनरल सर्जरीसाठी मेरिटने प्रवेश मिळविला.


तिने जनरल सर्जरीचे प्रथम वर्ष पूर्ण केले असून, तिचे दुसरे वर्ष सुरु होत आहे. नुकतेच घरी आई-वडिलांकडे आलेली धनश्री आई बरोबर स्कुटीवरुन जात होती. स्कुटी चिखलात स्लिप होऊन दोन्ही पडल्या. दुर्दैवाने तिच्या लहानपणी रॉड टाकून वाचवलेल्या मांडीचे हाड सांध्या तून फॅक्चर झाले. काळाने परीक्षाच घेण्याच्या ठरवलेल्या धनश्रीवर पुन्हा आघात झाला. हार मानेल ती धनश्री कुठली!


मोठ्या शस्त्रक्रियेनंतर वाचलेल्या पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्री व त्याचे परिवार राहुरी व शिर्डी येथील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवून शहरातील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तिच्या जिद्दीची यशोगाथा पाहून डॉक्टर देखील भारावले. तिच्या त्या पायावर व पुणे येथील डॉ.चेतन पुरम आणि अस्थिरोग तज्ञ डॉ. गणेश झरेकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा जनरल सर्जन होण्याचे स्वप्न पूर्ण करुन आरोग्य क्षेत्रात सेवा देणार असल्याची भावना डॉ. धनश्री कोहोक यांनी व्यक्त केली.


हॉस्पिटलच्या वतीने तिच्या प्रेरक व थक्क करणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाला सलाम करुन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गणेश झरेकर, डॉ. अमित बडवे, डॉ. सतीश सुपेकर, भुल तज्ञ डॉ. किशोर खरड, डॉ. प्रताप गिरगुने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *