खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना दिली शिक्षणाची दिशा; 16 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवली पीएचडी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. सर्जेराव निमसे यांचे व्यक्तिमत्व स्वयंप्रकाशित आहे. ज्यांनी आपली सगळी हयात अध्ययन आणि अध्यापनात घालवली. अशा कर्तृत्वशाली व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. डॉ. निमसे यांचे अकॅडमी करिअर अतिशय उज्वल राहिलेले आहे. गणित या विषयाचे ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. काही वर्षाच्या अध्यापनानंतर 2004 साली ते अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य झाले. त्या महाविद्यालयाला त्यांनी उज्वल असे यश मिळवून दिले.
त्या महाविद्यालयाचा त्यांनी भौतिक आणि शैक्षणिक विकास घडून आणला. अध्यापन कौशल्य इतकेच त्यांनी प्रशासनिक कौशल्य देखील प्राप्त केले आहे. अहिल्यानगरचे ते एक महत्त्वाचे महाविद्यालय आहे, त्यांच्या शांत निगर्वी आणि विनम्र व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांच्यावर उमटलेला आहे. प्राचार्य म्हणून कार्य करीत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विकासातही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांचे कार्यक्षेत्र केवळ अहिल्यानगर पुरते मर्यादित राहिले नाही, त्याचा विस्तार पुणे विद्यापीठापर्यंत झाला अनेक पद त्यांनी उपभोगली व त्या पदांना योग्य असा न्याय दिला. त्या पदांवर त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम केले आहे. डॉ. सर्जेराव निमसे यांचा शैक्षणिक प्रशासनाचा अनुभव अतिशय समृद्ध आहे. प्राचार्य होण्यापूर्वी ते नगर येथील इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटचे डायरेक्टर होते. या काळात त्यांनी व्यवस्थापनाशी संबंध आला आणि तो अनुभव त्यांना प्राचार्य म्हणून काम करीत असताना उपयोगी पडला. त्यांच्या प्रशासनाला व्यवस्थापनाची जोड मिळाली त्यांचे प्रशासन हे लोकाभिमुख होते.
खेड्यापाड्यातून आलेल्या सर्वसाधारण परिस्थितीतल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव होती. त्यांच्या अडीअडचणी त्यांनी सहानुभूतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. संवेदनशील मन लाभल्यामुळे त्यांचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष असत तेव्हा ते यशस्वी प्राचार्य ठरले. प्रशासन हे विज्ञानही आहे आणि कलाही हे त्यांनी सिद्ध केले. डॉ. सर्जेराव निमसे यांना 2008 ते 2013 या काळात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरू पद भूषवण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्या कार्य काळामध्ये त्यांनी या विद्यापीठाला चांगला आकार देण्यासाठी प्रयत्न केले. शासनाशी त्यांचा चांगला संबंध होता. विद्यापीठाच्या भौतिक विकासासाठी महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडून आवश्यक तो निधी प्राप्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
ते कुलगुरू असताना मी राज्यसभेचा सदस्य होतो. एक-दोन वेळा दिल्ली येथे माझ्याकडे ते थांबले होते आणि म्हणून मला विद्यापीठात काय चालले हे त्यांच्याकडून कळत असे. प्राचार्य किंवा कुलगुरू म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींचा जनसंपर्क मोठा असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या अंगी नेतृत्व गुण असल्याशिवाय जनसंपर्क वाढता येत नाही. डॉ. सर्जेराव निमसे यांचा जनसंपर्क मोठा होता, म्हणून त्यांना अनेकांचे सहकार्य मिळाले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला चांगला आकार देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शिक्षण प्रेमी लोकांशी त्यांनी मित्रत्वाचे संबंध निर्माण केले. आपला कार्यकाळ संपल्यानंतरही या भागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांच्याशी त्यांचा संपर्क राहिला आहे हे विशेष.
या विद्यापीठाला त्यांनी पायाभूत सुविधा मिळवून दिल्या. लातूर येथील विद्यापीठाची उपकेंद्राची भव्य अशी पाच मजली इमारत त्यांनी उभारली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यापीठातील अस्थाई कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आवश्यक असणाऱ्या प्राध्यापकांच्या जागाही भरल्या या विद्यापीठातील कार्यकाळ संपल्यानंतर ते लगेच उत्तर प्रदेश राज्यातल्या लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू झाले. तेथे त्यांनी अतिशय प्रभावीपणे कार्य केले. एका जुन्या विद्यापीठांमध्ये काम करणं ही फार मोठी जबाबदारी असते. नांदेडचे विद्यापीठ नवीन होते. नवीन विद्यापीठाचे प्रश्न वेगळे असतात, लखनौ विद्यापीठ हे जुने होते, जुने विद्यापीठाचे प्रश्न वेगळे असतात. विकसित विद्यापीठ आणि विकसनशील विद्यापीठाचे प्रश्न वेगवेगळे असतात, पण या दोन्ही कारकिर्दी डॉ. निमसे सरांनी यशस्वी ठरवल्या. ते इंडियन सायन्स काँग्रेसचे प्रेसिडेंट म्हणून निवडून आले होते. खरे तर त्यांना प्राप्त झालेला हा फार मोठा बहुमान आहे. डॉ. निमसे हे हाडाचे शिक्षक आहेत, अध्यापनाची त्यांना मनापासून आवड आहे. अध्यापनाबरोबर त्यांनी गणित या विषयांमध्ये संशोधनही केले पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ते गाईड होते 16 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. जवळपास 40 संशोधन पर निबंध त्यांनी लिहिले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये ते प्रकाशित झाले आहेत, तसेच त्यांनी सामाजिक आर्थिक प्रश्नांवरही लेखन केले असून, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांचा नेहमी सातत्याने सहभाग असतो. त्यांनी गणित व आदी विषयांवर एकूण 13 पुस्तके लिहिली असून, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा खूप विस्तारलेल्या आहेत ते ज्ञान व्रती मितभाषी आहे. त्यांचे कामच त्यांच्याविषयी बोलते डॉ. निमसे यांच्या सामाजिक जाणीव प्रखर आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी आतापर्यंत कार्य केले आहे ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. या निमित्ताने महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास केला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी अनेक मित्रांची चर्चा केली त्यांनी माझ्या यासंदर्भात सातत्याने चर्चा करत डॉक्टर निमसे यांचे अहिल्यानगरच्या सार्वजनिक जीवनात एक वेगळे स्थान आहे. नगरच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक जीवनात त्यांचा वावर अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचे व्यक्तिमत्व ज्ञानसंपन्न अनुभव संपन्न आणि चारित्र्यसंपन्न आहे, त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो याच शुभेच्छा.
-डॉ.जनार्धन वाघमारे (प्रथम कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
