फक्त पैसा म्हणजे यश नसून, समाजात चांगले माणुस होता आले पाहिजे -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनाच्या खडतर प्रवासातही ध्येय गाठता येतो. ध्येय गाठण्यासाठी जीवनाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. काहीतरी उद्दिष्ट, ध्येय समोर ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. यशस्वी होणे म्हणजे फक्त पैसा कमविणे नसून, चांगला माणुस म्हणून समाजात आपले अस्तित्व निर्माण करता आले पाहिजे. यासाठी संस्कार, शिक्षण व ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केले.
निर्मलनगर रोड, येथील डॉ. ना.ज. पाऊलबुध्दे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी बोडखे बोलत होते. यावेळी मांजरसुंबा येथील ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कदम, प्राचार्य भरत बिडवे, कृषीअधिकारी महादेव ढाकणे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना बोडखे म्हणाले की, आवड असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी. बिकट परिस्थिती हा मुद्दा गौण असून, जिद्दीपुढे परिस्थितीला हार मानावी लागते. गरजू घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना सर्वपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्राचार्य भरत बिडवे म्हणाले की, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात बाबासाहेब बोडखे यांचे सातत्याने योगदान सुरु आहे. कोरोना काळात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन निराधार, दिव्यांग व मतीमंद मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवित असतात. अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत त्यांनी दिली आहे. आपल्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी सायकलचे देखील वाटप केले आहे. तर दरवर्षी विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक साहित्य देत असतात. बिकट परिस्थितीची जाणीव ठेऊन त्यांनी दिलेले योगदान दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. महादेव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या क्षेत्रात मोठे व्हावे व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. पारितोषिकांची यादी वाचन जयश्री केदार यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण राजेंद्र मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन जेष्ठ शिक्षिका प्रा. आशा गावडे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष विनय पाऊलबुद्धे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी व उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी केले. आभार रोहिदास चौरे यांनी मानले.
