सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पदव्युत्तर महाविद्यालय आणि संशोधन संस्थेस रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटीने महिला व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीनची भेट देण्यात आली. या मशीनद्वारे वापरलेले गेलेले सॅनिटरी नॅपकिनची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
दादाराम ढवाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मशीन प्रदान सोहळ्याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रसन्न देवचके, सचिव उज्वला राजे, सदस्य ॲड. अभयजी राजे, शशिकला बिहाणी, डॉ.अजिता चोभे, ॲड युवराज पाटील, जयश्री पाटील, संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, विश्वस्त दत्ताजी जगताप, ढवाण मॅडम, प्राचार्य रविंद्र चोभे, पर्यवेक्षिका कार्ले मॅडम, प्रा.पारधे मॅडम, मुख्याध्यापक संदिप भोर आदींसह शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला किंवा मुली वयात आल्यानंतर शरीर धर्मानुसार सॅनिटरी नॅपकिन वापरत असतात. मात्र वापर झालेनंतर ते उघड्यावर अथवा कचऱ्यामध्ये फेकुन दिले जाते किंवा संडासच्या भांड्यामध्ये टाकले गेल्याने टॉयलेट जॅम होण्याचे प्रकार घडत असतात. हा धोका बऱ्यापैकी शाळा महाविद्यालयामध्ये जाणवत असल्याने रोटरी क्लब अहमदनगर डिग्निटीच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेने अशा मशिनची गरज असल्याचे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटी सदस्यांशी भेटी दरम्यान संवाद झाला व तातडीने प्रतिनिधीक स्वरुपात अध्यक्ष डॉ. प्रसन्न देवचके व सदस्य ॲड. अभय राजे यांनी सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करुन दिल्याचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र चोभे यांनी सांगितले. रोटरी क्लबच्या सचिव उज्वला राजे म्हणाल्या की, बी.एड.कॉलेज व माध्यमिक शाळेचे विद्यार्थिनी व शिक्षिकांना या मशिनचा उपयोग होऊन निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे. तर महिलांचा आत्मसन्मान देखील उंचावला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरीचे अध्यक्ष प्रसन्न देवचक्के यांनी बी.एड. कॉलेजने या सेवेसाठी संधी उपलब्ध करुन दिली. यापुढील काळातही संस्थेबरोबर राहून काम करण्याचे आश्वासन दिले. दादाराम ढवाण यांनी रोटरीने युवती व महिलांची गरज ओळखून राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. अजिता चोभे यांनी मुलींना वयात आल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. रविंद्र चोभे यांनी शैक्षणिक संस्थेची माहिती देऊन राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्पे मॅडम यांनी केले. आभार धर्माधिकारी यांनी मानले.
