आंबेडकर फाउंडेशन व उडान फाउंडेशनचा रतडगावला उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर -आरती शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर असून, त्यांनी केलेल्या संघर्षमय जीवनातून विषमता नष्ट होऊन मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, एकात्मता निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक घटना लिहिली. सर्व समाजाला आपल्या ज्ञानमयसागरातून जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले. ज्ञानरूपी प्रकाश सर्वांच्या आयुष्यात येण्यासाठी त्यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन उडान फाऊंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले.
आंबेडकर फाउंडेशन व उडान फाउंडेशनच्या वतीने रतडगाव (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे बोलत होत्या. यावेळी जय युवाचे ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, भरत खाकाळ, दिलीप घुले, रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, ॲड. विद्या शिंदे, ॲड. सुनील तोडकर, सुनील सकट, वैशाली कुलकर्णी, अनिल साळवे, अशोक डोंगरे, सिताराम खाकाळ, प्रकाश वडवणीकर, बाळासाहेब खेसे, तुकाराम भिंगारदिवे, संपत मोरे, गणेश मारवाडे, भारती शिंदे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी शाहीर दिलीप शिंदे, दादू साळवे, वसंत डंबाळे यांनी विविध समाजप्रबोधनाचे गीत सादर केले. भरत खाकाळ यांनी समाजातील शोषणाविरुद्ध व अन्यायाविरुद्ध बाबासाहेबांनी बंड केला. त्यांनी शोषितांना मानवी हक्काची जाणीव करुन दिली. आजही या महान घटनाकारांच्या विचारावर देशाचा कारभार सुरु आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाचे नायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण सुरक्षा केंद्र अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.