कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सादर केले विविध संशोधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात तीन दिवसीय संशोधन पद्धतीची कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यापीठ संशोधन विभाग यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सुनील नाथा म्हस्के यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. म्हस्के यांनी संशोधकांनी समाज उपयोगी संशोधन करून ते उत्कृष्ट जर्नल्स मध्ये प्रकाशित करून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळावा आणि यासाठी आजची युवा पिढी सक्षम करण्याचे काम या कार्यशाळेच्या माध्यमातून केले जाणार असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यशाळेत संशोधनाची व्याख्या, संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर, विषयाची निवड व प्रकल्प अहवाल तयार करताना घ्यावयाची काळजी व येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी याबाबत डॉ. सुवर्णा गणवीर यांनी मार्गदर्शन केले. संशोधन पद्धतींचा नमुना, निवड आढावा, संदर्भसूची, सहभागीदारांची निवड, डॉ. योगिता औताडे याविषयी माहिती दिली.
प्रा. डॉ. किरण वाकडे यांनी संशोधन करताना कायदेशीर बाबींची माहिती देऊन सविस्तर चर्चा केली. परिचर्या महाविद्यालयाचे प्रा. अमोल टेमकर यांनी संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती विषयी माहिती दिली. सहाय्यक प्राध्यापक अमित कडू यांनी संशोधनासाठी लागणारे साहित्य शोध कसे करावे? याविषयी मार्गदर्शन केले.
उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांनी संशोधन निकालाची मांडणी कशी करावी, प्रकल्प अहवाल निष्कर्ष व शिफारशी कोणत्या पद्धतीने लिहावेत व शब्दरचना, शब्दार्थ वाक्यरचना, टायपिंग बाइंडिंग, आदींबद्दल शेवटच्या क्षेत्रात मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. दिपक अनाप यांनी संशोधनासाठी प्रश्नावली कशी तयार करावी आणि योग्य सॅम्पल साईज कशी मोजावी याविषयी माहिती दिली. डॉ. विशाल इंदूरकर यांनी जर्नल्स साठी पेपर कसा तयार करावा याविषयी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर यांनी ज्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला त्यांना या माहितीची नक्कीच भविष्यातील संशोधन कामासाठी उपयोग होईल आणि समाज उपयोगी संशोधन होणार असल्याची भावना व्यक्त केली. यामध्ये एमएससी नर्सिंगच्या प्रथम सत्रातील विद्यार्थी, शिक्षक व अमिओपॅथीचे विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला होता.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी मेडिकल डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. रामचंद्र पडळकर यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल सामाजिक परिचर्या विभागाचे अभिनंदन केले. शेवटच्या दिवशी समारोपीय कार्यक्रमात कार्यशाळेचा रिपोर्ट सादर करून सर्व मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला.