• Fri. Feb 6th, 2026

दोस्ती फाउंडेशनचा समाजसेवा पुरस्कार पै. नाना डोंगरे यांना प्रदान

ByMirror

Feb 5, 2026

श्रीरामपूरला लोककलावंत मजनू भाई शेख स्मृती गौरव सोहळ्यात झाला सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दोस्ती फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित लोककलावंत पै. मजनू भाई शेख राज्यस्तरीय स्मृती गौरव पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन डोंगरे यांना पुरस्कार देण्यात आला.


या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान साहित्यिक तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. महावीरसिंग चौहाण यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूरच्या आरटीओ राणीताई सोनवणे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग व निराधार संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संदीपकुमार बोरकर, संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक रज्जाकभाई शेख, कवी आनंदा साळवे, सुनिता वाळुंज, कवयित्री श्‍वेता सावंत, संदीप रासकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात लोककलावंतांनी वासुदेव, गोफ्लधळी, पोतराज, पिंगळे आदी पारंपरिक लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या लोककला सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली होती.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण सामाजिक कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती निर्माण केली आहे.


स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जनजागृती मोहीम, रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम व्यापक स्वरूपात राबविले जात आहेत. युवकांसाठी व्यसनमुक्ती संदर्भातील कार्यक्रम, तसेच गावपातळीवर आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामस्थांना आरोग्यसेवा देण्याचे कार्यही संस्थेमार्फत सुरू आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, युवा संमेलनांच्या आयोजनातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.


साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी पै. नाना डोंगरे यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने तसेच चार ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या या बहुआयामी सामाजिक कार्याची दखल घेऊनच दोस्ती फाउंडेशनच्या वतीने त्यांना समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पै. नाना डोंगरे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *