फ्लड लाईटमध्ये रंगतोय स्पर्धेचा थरार; रविवारी अंतिम सामना
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉन बॉस्को कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रेल्वे पोलीस अधीक्षक तुषार डोशी यांच्या हस्ते झाले. या फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला असून, चर्चच्या मैदानात फ्लड लाईटमध्ये स्पर्धेचा थरार रंगत आहे.
पोलीस अधीक्षक डोशी यांनी मैदानात नारळ वाढवून व फुटबॉलला किक मारुन स्पर्धेला प्रारंभ केले. सेंट जॉन्स चर्चचे फादर विश्वास परेरा, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुषार डोशी यांनी सेंट जॉन्स चर्चच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या फुटबॉल स्पर्धेचे कौतुक केले. तर युवकांनी आरोग्यासाठी मैदानावर येण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फादर विश्वास परेरा म्हणाले की, सेंट जॉन्स चर्च फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना घडविण्याचे काम करत आहे. विविध स्पर्धा घेतल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
मनोज वाळवेकर म्हणाले की, सर्व युवक फक्त फुटबॉलच्या नाट्यमयतेचे साक्षीदार होण्यासाठी जमले नसून, डॉन बॉस्को यांनी आयुष्यभर उत्कटतेने प्रोत्साहित केलेल्या तरुणाईच्या जिव्हाळ्याचा, संघटनाशीलतेचा आणि क्रीडाधर्माचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. ही स्पर्धा त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करणारी आहे. त्यांच्या विचाराने युवकांना प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच दिवसीय फुटबॉल स्पर्धा फादर विश्वास परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. स्पर्धेच्या प्रारंभापासूनच विविध संघातील खेळाडूंनी कौशल्यपणाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहे. खेळाचे सामने पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमी गर्दी करु लागले आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि.28 एप्रिल) होणार आहे. पहिल्या दोन दिवसीय स्पर्धेत युनिटी, शिवाजीयन्स, फायटर बॉईज व लाइटनिंग संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजय संपादन केले. शहरातील महिला रेफ्री प्रियंका आवारे व सोनिया दोसानी या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहत आहेत.
