मिठाई, फराळ व मिष्टान्न भोजनचे वाटप
संदीप (दादा) कोतकर मित्र मंडळ व निशा उद्योग समूहाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार व पिडीत मनोरुग्णांचा सांभाळ करुन त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे अरणगाव येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात संदीप (दादा) कोतकर मित्र मंडळ व निशा उद्योग समूहाच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. संस्थेतील निराधार व मनोरुग्णांना मिठाई, फराळ व मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले.
घरापासून दुरावलेल्या बेवारस मनोरुग्णांची दिवाळी गोड करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उद्योजक सचिन (आबा) कोतकर, जालिंदर कोतकर, अजित कोतकर, बाळासाहेब कोतकर, उमेश कोतकर, मनोज येरकळ, डॉनियल काळोखे, संतोष शेटे, संजय चौधरी, रावसाहेब शेटे, संजित क्षीरसागर, सुमित लोंढे, सोनू घेंबुड, पोपट कराळे, भाऊ गुंड, केतन भंडारे, अभी गावडे आदी उपस्थित होते.

जालिंदर कोतकर म्हणाले की, दिवाळी सण आनंद लुटण्याचा नव्हे आनंद वाटण्याचा सण आहे. या भावनेने निराधार व पिडीत मनोरुग्णांची दिवाळी गोड करण्यात आली. ज्येष्ठ नेते भानुदासजी कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वारसा पुढे चालविला जात आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांनी शहराला विकासाचे व्हिजन दिले. त्याच धर्तीवर शहराचा झपाट्याने कायापालट झाला. विकास व दुर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य त्यांच्या प्रेरणेने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन (आबा) कोतकर म्हणाले की, अध्यात्माला समाजकार्याची जोड असावी. खऱ्या गरजवंताला दिलेली मदत ही सत्कर्मी लागते. मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. दिवाळी हा अंधकार दूर करणारा सण असल्याने प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतांना आधार देण्याचे त्यांनी आवाहन केले. या उपक्रमाने मानवसेवा प्रकल्पातील निराधार व पिडीत मनोरुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले होते.